कोरोना अपयश लपवण्यासाठी भाजपकडून पायाभरणीचा कार्यक्रम : थोरात

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारकडून राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. तसेच राम मंदिर हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या श्रद्धेचा विषय असल्याचे म्हणत सावध भूमिका घेतली आहे.

 

 

अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम येत्या ५ ऑगस्टला जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. कोरोनाच्या संकटकाळात राममंदिराचे भूमिपूजन इतके महत्त्वाचे आहे का, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी मुंबई प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बाळासाहेब थोरात म्हणाले, श्रीराम हे दैवत आहेत. पण रामाचे दर्शन घ्यायला आपण जगले पाहिजे. आपण जगलो तर रामाचे दर्शन घ्यायला जाऊ. आता माणसे जगवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. कोरोनाच्या काळात सरकारच्या अपयशावरुन दुर्लक्ष करण्यासाठीच राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम केला जातोय. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राम मंदिर पायाभरणीसाठी जाण्याच्या शक्यतेवरही भाष्य केले. राम मंदिर हा उद्धव ठाकरे यांच्या श्रद्धेचा विषय आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Protected Content