कोरोना : अतिदुर्गम आदिवासी पाड्यावर जनजागृती आरोग्य शिबिर ; गरोदर मातांसह लहान बालकांचे लसीकरण

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सातपुडा पर्वतातील अतिदुर्गम भागात हिंगोणा गावापासून 45 किलोमीटर लांब असलेल्या रुईखेडा या आदिवासी पाड्यावर कोरोना संसर्गजन्य आजाराच्या संदर्भात नुकतेच जनजागृती आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी दर माता आणि लहान बालकांना लसीकरण करण्यात आले.

 

कोरोना या अत्यंत घातक अशा संसर्गजन्य आजारामुळे सर्वत्र भीतीचे सावट असल्यामुळे यावल तालुक्यातील हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून दिनांक २० एप्रिल रोजी अतिदुर्गम भागात असलेल्या रुईखेडा या आदिवासी पाड्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ फिरोज.एम.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी बांधवांसाठी मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. यावेळी या आजाराविषयी तसेच सुरक्षते विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी गरोदर माता आणि लहान बालकांना लसीकरण देण्यात आले व औषधी वाटप करण्यात आली.

या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी फिरोज.एम.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी अशोक तायडे, कैलास कोळी, आरोग्य सहाय्यक श्रीमती मरपुले, आरोग्य सेविका श्रीमती भवरे, आरोग्य सेवक पी.ई.सावळे, विलास महाजन यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. अतिदुर्गम भागात जाऊन वैद्यकीय अधिकारी डॉ.तडवी यांनी या संकटसमयी घेतलेल्या कार्यक्रमाचे पाड्यावरील आदिवासी बांधवांनी स्वागत करून कौतुक केले.

Protected Content