कोरोनावर उपयुक्त असल्याचा दावा करणार्‍या फॅबीफ्ल्यूवर बंदी आणा- डॉ. अमोल कोल्हे

मुंबई प्रतिनिधी । पतंजलीच्या कोरोनील औषधावर बंदी आणल्यानंतर उलट-सुलट चर्चा सुरू असतांनाच कोरोनावर उपयुक्त असल्याचा दावा करणार्‍या फॅबीफ्ल्यू या टॅबलेटवर देखील बंदी आणावी अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.

सध्या कोरोनावर अमुक-तमुक औषध उपयुक्त असल्याचे दावे केले जात आहेत. यात बाबा रामदेव यांच्या पतंजलीने तयार केलेले कोरोनील हे औषध उपयुक्त असल्याचा दावा अलीकडेच करण्यात आला होता. यावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत असतांनाच महाराष्ट्र व राजस्थानमध्ये यावर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर आता ग्लेनमार्क या कंपनीने तयार केलेल्या फॅबीफ्ल्यू या टॅबलेटवरही बंदी आणावी अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. या प्रकरणी त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे. यात ग्लेनमार्कच्या दाव्याबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या टॅबलेटचे मूल्य १०३ रूपये असून याचे १४ दिवसांमध्ये १२२ गोळ्याचे डोस घेण्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे १२ हजार रूपयांपेक्षा जास्त खर्च हा सर्वसामान्यांना परवडणार नसल्याचेही डॉ. कोल्हे यांनी नमूद केले आहे. यामुळे या औषधीवर तातडीने बंदी आणून याबाबत सखोल चाचण्या व चर्चा करूनच याला परवानगी देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

Protected Content