पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील लोणी काळभोर येथील ग्रामपंचायतचे माजी सदस्याने कोरोनामुक्तीचा जल्लोष करत थेट डीजे लावत डान्स केला. विशेष म्हणजे यात या रुग्णासह त्याचे मित्र आणि नातेवाईकही विना मास्क सहभागी होत नाचले. याप्रकरणी प्रशासनाने १६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पुण्यात लोणी काळभोर येथील माजी ग्रामपंयात सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मागील १० दिवसांपासून हडपसरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. बुधवारी उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, बरे झाल्याच्या आनंदात त्यांचे गावात थेट डीजे लावून स्वागत करण्यात आले. डीजेच्या ठेक्यावर डान्स करताना उपस्थितांनी शारीरिक अंतर ठेवणे, मास्क घालणे आणि इतर अनेक नियमांची पायमल्ली केली. या जल्लोषाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी व्हिडीओत दिसणाऱ्या १६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.