कोरोनाबाधीत क्लिनरच्या संपर्कात आलेल्यांना डिस्चार्ज; आता क्वॉरंटाईनमध्ये राहणार

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथे कोरोना पॉझिटीव्ह क्लिनरच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना शाहू महाराज रूग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून घरी पाठविण्यात आले असून त्यांना आता होम क्वॉरंटाईनमध्ये रहावे लागणार आहे.

यावल प्रतिनिधी तालुक्यातील. दहिगाव येथे आंध्र प्रदेश मधील १७ एप्रिल रोजी कांदे भरण्यासाठी आलेल्या ट्रक वरील कोरोना पॉझिटिव्ह क्लीनर च्या संपर्कात आलेले सहा व्यक्तींना शाहू महाराज रुग्णालय जळगाव येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले होते. त्यांचे स्वाब तपासणीसाठी धुळे येथील लॅब मध्ये पाठवण्यात आले होते. या सर्वांचा अहवाल निगेटीव्ह आलेला आहे. त्यामुळे दहिगाव व परिसरातील जनतेने सुटकेचा निश्‍वास घेतलेला आहे.
यानंतर या सहाही व्यक्तींना आज सकाळी रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेले असून त्यांना आरोग्य विभागाकडून विलगीकरणामध्ये राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडा सिम येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे व डॉ. नसीमा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली दहिगाव येथे आरोग्य पथकातील राजेंद्र बारी, श्रीमती अनिता नेहते, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, व मदतनीस हे विलगीकरणा मध्ये असलेल्यांना भेटी देऊन जनजागृती करीत आहेत.

दरम्यान, गावात भेटी देताना काही नागरिक आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांच्याशी वाद घालीत आहे. अशावेळी पोलीस पाटील संतोष पाटील , सरपंच देवीदास पाटील , कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सत्तार तडवी यांची मदत घेण्यात आली तसेच ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक घरी सॅनीटायझर वाटप करण्यात येत आहे. तसेच पर जिल्ह्यातून येणार यांची माहिती मिळताच पोलीस प्रशासन पोलीस स्टेशन ला नेऊन नोंदणी केली जात आहे. आज दहिगाव येथे दुसर्‍या जिल्ह्यातून आलेल्या तीन व्यक्तींना पोलीस स्टेशनला नोंदणी करून त्यांना गावातील शाळेत विलगीकरण कक्षात राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

Protected Content