कोरोनाच्या प्रतिकारासाठी काँग्रेसच्या दहा मागण्या

नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनाच्या प्रतिकारासाठी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ट्विटरच्या माध्यमातून दहा मागण्या केल्या आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून केंद्र तसेच विविध राज्यांमधील सरकारे प्रयत्न करत आहेत. देशातील विविध राजकीय पक्षांनी या उपाययोजनांना पाठींबा दिला आहे. खरं तर कोरोनाच्या उपाययोजनांबाबत नेत्यांनी मोठ्या प्रमाणात परिपक्वता दाखविल्याचे सुखद चित्र आहे. कालच जनता कर्फ्यूचे सर्व पक्षांनी केलेले पालन हे याचेच द्योतक आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी विविध ट्विटस्च्या माध्यमातून सरकारकडे दहा मागण्या सादर केल्या आहेत.

यामध्ये खालील मागण्यांचा समावेश आहे.

१) आरोग्य विभागात काम करणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी N95 मास्क, ग्लोव्ह्ज, फेस शील्ड, गॉगल्स, हँड कव्हर्स, रबराचे बूट, डिस्पोजेबल गाऊन उपलब्ध करुन द्यावेत जेणेकरुन करोनापासून त्यांचा बचाव होऊ शकेल

२) देशातील डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सगळ्यांनाच अभिमान आहे. करोनाशी दोन हात करताना हे सगळेच अत्यावश्यक सेवा देत आहेत. त्यांना विशेष आर्थिक मदत दिली पाहिजे. सरकारने त्यासाठीची घोषणा तातडीने करावी

३) करोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने व्हेंटीलेटर्सची संख्या वाढवावी कारण १३० कोटीच्या देशात सध्याच्या घडीला फक्त ३० हजार व्हेंटीलेटर्स आहेत.

४) करोना व्हायरसच्या रुग्णांसाठी आयसोलेशन बेड्सची व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरुन त्यांचा संसर्ग इतरांना होणार नाही

५) करोनाची लागण झाली आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी तपासण्या वाढवण्याची गरज आहे कारण आत्तापर्यंत फक्त १६ हजार लोकांचीच चाचणी करण्यात आली आहे.

६) देशभरात हँड सॅनिटायझर्स, मास्क आणि लिक्विड सोप यांचा काळा बाजार वाढला आहे. हा काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. तसंच भाज्या, डाळी, कांदे, बटाटे यांचे दर रोज वाढवणाऱ्यांवरही कारवाई केली पाहिजे.

७) रोज मजुरी करणारे लाखो लोक, मनरेगाचे मजूर, इतर कामगार, शेतकरी आणि असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या हाताला काम नाही त्यांना सरकारने आर्थिक मदत करावी

८) करोनामुळे बळीराजावर मोठं संकट ओढावलं आहे. आधीच त्रस्त असलेला शेतकरी आणखी त्रस्त झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत द्यावी.

९) लघू आणि मध्यम व्यावसायिक यांचंही करोनामुळे मोठं नुकसान झालं आहे सरकारने त्यांच्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावं

१०) करोनामुळे मध्यमवर्गीय लोक, पगारी काम करणारे कर्मचारी यांनाही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. जे लोक EMI भरत आहेत तो स्थगित करावा म्हणजे या वर्गालाही काही प्रमाणात मदत होईल.

आता या दहा मागण्या काँग्रेसने केल्या आहेत. या मागण्या सरकार मान्य करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Protected Content