दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद : आरबीआयने दिलेली माहिती

download 4

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवल्याची माहिती समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षात २००० रुपयांची एक नोटही छापलेली नाही. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरबीआयने ही माहिती दिली आहे.

 

केंद्र सरकारने २०१६मध्ये नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर पहिल्यांदाच २००० रुपयांची नोट चलनात आणली. काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांची नोट चलनातून बाद करण्यात आली. त्यानंतर २००० रुपयांची नोट चलनात आणण्यात आली. यावरून केंद्र सरकार आणि आरबीआयवर टीकाही झाली. जाणकारांच्या मतांनुसार, जास्त मूल्याच्या या नोटेमुळे पुन्हा काळा पैसा वाढेल. याशिवाय २००० रुपयांच्या नोटेमुळे सुट्ट्या पैशांची समस्याही वाढेल, असेही त्यांनी सांगितले होते.

‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने आरबीआयकडे माहिती अधिकारात माहिती मागवली होती. त्याला उत्तर देताना आरबीआयने चालू आर्थिक वर्षात २००० रुपयांची एकही नोट छापली नाही, अशी माहिती दिली आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये २००० रुपयांच्या ३५४.२९ कोटी नोटा छापण्यात आल्या तर २०१७-१८ मध्ये ११.१५ कोटी नोटांची छपाई करण्यात आली होती. २०१८-१९मध्ये ४.६६ कोटी नोटांची छपाई करण्यात आली. तर चालू आर्थिक वर्षात एकही नोट छापण्यात आली नाही, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.

गेल्या आर्थिक वर्षात २००० रुपयांच्या नोटा चलनात कमी प्रमाणात आल्या. २०१८-१९मध्ये चलनातील २०००च्या नोटा ७.२ कोटींनी कमी झाल्या.रिझर्व्ह बँकेकडील आकडेवारीनुसार, बनावट नोटांची संख्या तेजीने वाढत आहे. नोव्हेंबर २०१६मध्ये नोटाबंदीनंतर २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या तर २०१७मध्ये पाचशेच्या नव्या नोटा चलनात आणल्या. आर्थिक वर्ष २०१७-१८च्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात बनावट नोटांमध्ये १२१ टक्क्यांनी वाढ झाली. तर २००० रुपयांच्या बनावट नोटांची आकडेवारी २१.९ टक्के आहे. सरकारने २०० रुपयांची नोट २०१७मध्ये चलनात आणली. २०० रुपयांच्या १२, ७२८ बनावट नोटा सापडल्या. तर गेल्या वर्षी केवळ ७९ बनावट नोटा सापडल्या आहेत.

Protected Content