रावेर प्रतिनिधी । शेजारच्या मुक्ताईनगर व बर्हाणपुर परिसरात कोरोना आटोक्यात येतो तर रावेरात का नाही ? असा खडा सवाल करून याबाबत आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती आज राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी यांनी दिली आहे.
याबाबत वृत्त असे की, रावेर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यावर लवकर उपाय-योजना न केल्यास तालुका कोरोना बाधितांमध्ये जिल्हात एक नंबर जाऊ शकतो. रोज वाढणारे पेशंटमुळे प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.शेजारील मुक्ताई नगर व बर्हाणपुरमध्ये कोरोना नियंत्रणात आला असला तरी रावेर तालुक्यात का येत नाही याबाबत उद्याच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी यांनी सांगितले.
सद्या सर्व जग कोरोना मुळे त्रस्त आहे त्याला रावेर तालुका सुध्दा अपवाद नाही परंतु लोकप्रतिनिधीसह आरोग्य प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असून सर्व विभागाचे ताळमेळ जमत नसल्याने कोरोनाने तालुक्यात संसर्ग वाढीस लागला आहे. या पार्श्वभूमिवर आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे तक्रार करणार असल्याचे श्री चौधरी यांनी सांगितले.