मुंबई : वृत्तसंस्था । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील पोलीस दलाचं मोठं नुकसान झाल आहे. गेल्या 4 महिन्यात 95 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली कोरोना रुग्णांची वाढती संख्या कमी होताना पाहायला मिळत नाही. अशावेळी कोरोना रुग्णांचं मृत्यूचं प्रमाणही चिंता वाढवणारं आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस कर्मचारी जिवाची बाजी लावून अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, कर्तव्य पार पाडत असताना कोरोनामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू होत आहे. भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मार्च 2020 पासून सुरु झाला. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल 427 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात 2020 मध्ये 332 पोलिसांचा कोरोनामुळे जीव गेला. तर गेल्या 4 महिन्यात 95 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
2021 च्या सुरुवातीला कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं प्रमाण कमी होतं. पण एप्रिल महिन्यात तब्बल 64 पोलिसांचा कोरोनामुळे जीव गेलाय. तर मे महिन्याच्या सुरुवातीच्या 2 दिवसांत 5 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये तरुण पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त असल्यामुळे पोलीस दलासमोर नवा प्रश्न निर्माण झाला आहे.
2021 मध्ये जानेवारी ते मार्च महिन्यात पोलिसांच्या मृत्यूच प्रमाण नियंत्रणात होतं. मात्र, एप्रिल महिन्यात करोनाची दुसरी लाट आली. या दुसऱ्या लाटेत 64 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर मे महिना आता सुरू झाला आहे. मे महिन्याच्या 2 दिवसात 5 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.