मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असताना राज्य सरकारला केंद्र सरकारकडून रॅपिड टेस्टसाठी परवानगी मिळाली आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही याची माहिती पाच मिनिटात मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. तसेच कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे नेमके ठिकाण कळण्यासाठी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याला रॅपिड टेस्टसाठी परवानगी दिली असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे की नाही याची माहिती पाच मिनिटात मिळणार आहे. राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “टेस्टिंग वाढवलं पाहिजे अशी अपेक्षा नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. पाच हजार चाचण्या करण्याची आपल्या राज्याची क्षमता आहे. प्रत्येक जिल्ह्यात करोनासाठी स्वतंत्र रुग्णालय देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्याची अमबजावणीदेखील सुरु आहे. फक्त करोना रुग्णांसाठी वेगळी रुग्णालयं असावीत असा आग्रह केंद्र सरकारने, नरेंद्र मोदींनी धरला आहे. त्याप्रमाणे आपण आधीच तयारी केली आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.