अन्वय नाईकांची संपत्ती हडपण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा ग्रामपंचायतीवर दबाव

रायगड: वृत्तसंस्था । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक यांची संपत्ती स्वत:च्या नावे करण्यासाठी ग्रामपंचायतीवर दबाव आणला होता, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या जमीन खरेदीचे सर्व व्यवहार कोर्टात उघड करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

किरीट सोमय्या यांनी आज रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात जाऊन ग्रामपंचायतीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी हा आरोप केला. मृत अन्वय नाईक यांच्या मालकीच्या १९ मालमत्ता ५ कोटी २९ लाख किंमतीच्या ग्रामपंचायतीने ठाकरे कुटुंबाच्या नावे कशा प्रकारे केल्या हे पाहून मान शरमेने खाली जाते. २०१४ मध्ये अन्वय नाईक यांच्याकडून ठाकरे परिवाराने करार केला होता. नाईक यांच्या मृत्यूनंतर ठाकरे परिवाराने ही जमीन स्वत:च्या नावे करून घेतली. हे सर्व व्यवहार आम्ही कोर्टात उघड करू, असं सोमय्या यांनी सांगितलं.

सोमय्या यांच्या आरोपावर कोर्लई ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी खुलासा केला आहे. २०१४ मध्ये रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नऊ एकर जमीन खरेदी केली होती. नाईक यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारस अज्ञा नाईक आणि वर्षा नाईक यांनी २०१८ मध्ये एक पत्रं सादर करून ही जमीन विकण्यास हरकत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या नावावर ही जमीन करण्यात आली, असं मिसाळ यांनी सांगितलं.

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच ठिकाणी त्यांची आई कुमुद नाईक यांचाही मृतदेह आढळून आला होता. त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती.

अन्वय नाईक हे इंटिरिअर डिझाईनर होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय यांच्या कॉनकॉर्ड कंपनीने रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी डिझाईनिंगचे काम केले होते.

हे काम पूर्ण झाल्यानतंरही नाईक यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नव्हते. कामाचे पैसे मिळवण्यासाठी अन्वय यांनी सातत्याने अर्णव गोस्वामींसह इतरांना विनंती केली होती. मात्र अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत होते.

Protected Content