कोरोनाची धास्ती व समाजाच्या तिरस्काराने घेतला वृध्दाचा बळी !

चाळीसगाव दिलीप घोरपडे । कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांना समाज हेटाळणीच्या नजरेने पाहत असून याच तिरस्कारामुळे तालुक्यातील शिवापूर येथील एका वृध्दाने आपले आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे आता तरी समाज कोरोनाग्रस्त वा त्याच्या संपर्कात आलेल्यांकडे निकोप नजरेने पाहणार का ? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

सध्या देशभर कोरोना व्हायरस थैमान घालत असून याचे अनेक बळी ठरले आहेत. अनेक रुग्ण याच्याशी झुंज देत आहेत तर काही संशयित विनाकारण समाजाच्या तिरस्काराने बळी जात आहेत. या व्हायरसने माणसाला माणसाच्या माणुसकीचे चांगले दर्शन घडवले अनेक लोक गोरगरीब जनतेस अन्नपुरवठा करून तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून मदतीचा हात देत आहे. यात अनेक सेवाभावी संस्था सतत कार्यरत आहेत. तर दुसरीकडे कोरोना संशयितांकडे पाहिल्या जाणार्‍या तिरस्काराने हीच माणुसकी विसरण्याचा दारुण अनुभव देखील येत आहे याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे शिवापूर येथील वृद्धाची आत्महत्या होय. गेल्या आठवड्यात शहरातील गजानन हॉस्पिटल येथील रुग्ण नाशिक येथे उपचारासाठी रवाना झाला असता तो कोरोना बाधीत असल्याची बातमी प्रशासनामार्फत संपूर्ण शहर जिल्हाभर पसरली. यानंतर या रुग्णालयात गेलेल्या व्यक्तींकडे समाजातून संशयित नजरेने पाहिले जाऊ लागले. वास्तविक या रुग्णालयातील सर्व कर्मचारी रूग्ण व डॉक्टर हे तपासणीमध्ये निगेटिव्ह आले आहेत. मात्र त्यापूर्वीच या रुग्णालयातील ओ.पी.डी.च्या रुग्णांची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने यादीतील लोकांकडे त्यात्या भागातून संशयाने पाहिले जाऊ लागले. यात शिवापूर येथील भरत कौतिक घाडगे (६५) यांचे देखील नाव होते. घाडगे यांच्याकडे गावात समाजात व नातेवाईकांमध्ये संशयित रुग्ण म्हणून पाहिले जाऊ लागले त्यांना जणूकाही वाळीत टाकले असावे अशी वागणूक त्यांना मिळाली. आपल्या बरोबर कोणी बोलत नाही आपल्या जवळ कोणी येत नाही या गोष्टीचा भरत घाडगे यांच्या मनावर परिणाम झाला. यामुळे घाडगे यांनी दिनांक १५ मे रोजी मध्यरात्री गावातीलच आपल्या खळ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली आणि आपला जीवन प्रवास संपवला.

वास्तविक या व्यक्तीस काहीही झालेले नव्हते संबंधित रुग्णालयातील सर्व तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह आलेत परंतु समाजात कोरोना संशयित म्हटले की त्याचा धसका सगळे घेतात आणि त्याला जणूकाही वाळीत टाकल्या सारखी वागणूक मिळते म्हणून घाडगे सारखा बळी जातो कोरोनाची भीती जरूर बाळगावी मात्र खात्री असल्याशिवाय कोणाचा तिरस्कार होऊ नये आणि त्यास योग्य सल्ला देऊन सहानुभूतीने वागणूक दिल्यास अशा प्रकारच्या घटना पुन्हा होणार नाहीत असे वाटते. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळता येतो. आणि झालाच तरी यावर मात करता येते हे कुणी समजूनच घेत नाही. तसेच इतर व्याधींप्रमाणे हा देखील एक बरा होणारा विकार असल्याचे आपण लक्षात घेतले पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोनाकडे समाजाने निकोप नजरेने पाहण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, याप्रकारे समाजात नवीन भेद सुरू होण्याची भिती आहे.

Protected Content