Home आरोग्य कोरोनाचा ताप अन पश्चाताप; ग्रामीण भागातील नागरिकांनी सजग व सावध राहणे गरजेचे...

कोरोनाचा ताप अन पश्चाताप; ग्रामीण भागातील नागरिकांनी सजग व सावध राहणे गरजेचे !

0
59


एरंडोल। कोरोना अर्थात कोव्हीड-१९
च्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे ! कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत थोडी घट दिसून येत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेत काही अंशी समाधान आहे. पण शहरी भागानंतर आता ग्रामीण भागात कोरोनाने हातपाय पसरविण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे पावसाळी वातावरणामुळे दरवर्षी त्रास देणारे आजार जसे कि टायफाईड, मलेरिया व चिकनगुनिया ह्यांचा प्रभाव पण वाढणार असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी सजग व सावध राहणे जरुरीचे आहे.

वाचा डॉ. नरेंद्र ठाकूर यांचा विशेष लेख.

कारण वरील उल्लेख केलेल्या आजारांमध्ये व जी वैश्विक महामारी सध्या धुमाकूळ घालत आहे त्या कोरोनामध्ये “ताप येणे” हे लक्षण सामायिक आहे. कोरोनामध्ये ८० टक्के रुग्णांमध्ये ताप असतोच व त्यासोबत इतर लक्षणे असतात. सामान्य नागरिकांमध्ये एक प्रकारचा गोंधळ उडतो की आलेला ताप हा कसला आहे , कोरोनाचा कि इतर आजारांचा !

बऱ्याच वेळा उपचार व निदान करणारे फॅमिली फिजिशयन ही गोंधळात पडतात किंवा रुग्ण डॉक्टरांकडे जाणे टाळून दिरंगाई करतात, डॉक्टरांनी सांगून सुद्धा कोरोना चाचणी सर्वप्रथम करत नाही अन त्यामुळे मात्र तापाचे रुग्ण गावात फिरत असतात व कोरोना असला तर त्याचा फैलाव करत असतात.

ताप आल्यानंतर जर सुरुवातीचे ३-६ दिवस दुर्लक्षित झाले व कोरोनाची चाचणी न करता, निदान न झाल्यामुळे उपचारास दिरंगाई झाल्यास असे कोरोनाग्रस्त रुग्ण हे अतिगंभीर होऊ शकतात व इतरांना हि ते कोरोनाचा संसर्ग करू शकतात. त्यामुळे सर्वसाधारण पणे ताप हा कुठल्या आजाराचा कसा असतो , कोरोनाचा कसा असतो , सोबतची लक्षणे व चाचण्यांची जुजबी माहिती असणे ह्या काळात हितकारक आहे.

(1) टायफाईड – ताप आल्यानंतर रक्त तपासणीअंती टायफाईड आहे असे सांगण्यात येते व त्यावर उपचार केले जातात . व कोरोनाकडे दुर्लक्ष होते !पण लक्षात ठेवले पाहिजे कि सद्यस्थितीत टायफाईड साठी केली जाणारी “विडाल टेस्ट ” हि अर्थहीन मानली जात आहे व हिचे रिपोर्ट व टायटर हे चुकीचे येत आहेत म्हणजे अनेक रुग्णामध्ये टायफाईडचा आजार नसून हि टायफाईड असल्याचा अहवाल प्राप्त होत आहे ! जर एखाद्या रुग्णास डॉक्टरांकरवी तपासणीअंती टायफाईडचीच शक्यता वाटत असेल तर खात्री साठी “ब्लड कल्चर ” ह्या रक्तचाचणीचाच पर्याय सध्यस्थितीत ग्राह्य धरला जात आहे. टायफाईडचा ताप हा तीव्र स्वरूपाचा असतो व संपूर्ण दिवसभर असतो व इतर कोरोनाची लक्षणे त्याबरोबर नसतात.

(२) डेंग्यु फेव्हर – डेंग्यू च्या आजारात तीव्र स्वरूपाचा ताप असतो . स्नायूवेदना असतात व अंगावर पुरळ जास्त प्रमाणात असते . डोकेदुखीचे वैशिष्ट्ये म्हणजे डोळ्याच्या अवतीभवतीचा भागाचा ह्यात समावेश असतो !व काही रुग्णांमध्ये दात व हिरड्यात सूक्ष्म स्वरूपात रक्तस्त्राव दिसून येतो. रक्ततपासणीत प्लेटलेट काउंट कमी असतो.

(३) मलेरिया – मलेरियाचा ताप हा तीव्र स्वरूपाचा असतो व तो बर्याच वेळा थंडी सोबत येतो . डोकेदुखी व उलटी ची लक्षणे असतात . मलेरियाचे निदान रॅपिड अँटीजेन टेस्ट व पेरिफरल ब्लड स्मिअर टेस्ट द्वारे अचूक होऊ शकते.

(४) चिकनगुनिया -सध्या ह्याचे रुग्ण आपल्याकडे आढळून येत नाही आहे . ह्यात अतिताप , तीव्र पाठदुखी व सांधेदुखी असते . डोकेदुखी व त्वचेवर पुरळ पण असते !डोळे दुखणे व डोळ्यासमोर प्रकाश सहन न होणे अशी इतर लक्षणे दिसतात.

(५) कोरोनाचा ताप हा सुरूवातीला “सौम्य “स्वरूपाचा असतो ! तो येत जात राहतो . अतिश्रमाने जाणवू शकतो व नंतर प्रत्येक दिवशी तो वाढत जातो. डोकेदुखी हि शक्यतो एका बाजूला व वरच्या बाजूला असते व तीव्र स्वरूपाची असते. चव जाणे , वास न येणे व गळ्यात दुखणे व सर्दी खोकल्यासोबत ताप असतो . काहीवेळेस अतिसार पण असतो.

लक्षात घेतले पाहिजे कि सध्यस्थितीत ताप, प्रचंड अंगदुखी व थकवा हि तीन लक्षणे जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. वृद्ध रुग्णामध्ये मात्र बर्याच वेळा ताप दिसून येत नाही तर नेहमीपेक्षा वेगळा असा तीव्र स्वरूपाचा ताप हा जास्त प्रमाणात संसर्ग शरीरात पसरला असेल , फुफ्फुसात लागण झाली असेल किंवा इतर काही आजार सोबत असतील तरच कोरोनात आढळतो.

कोरोनाच्या निदानासाठी असलेल्या रॅपिड अँटीजेन स्वाब टेस्ट , आर टी पीसीआर स्वाब टेस्ट ह्या नाकातील व घश्यातील द्राव्येच्या माध्यमातून केल्या जातात ! ह्याबाबतीत सर्वसामान्य नागरिकांमध्ये बरेच गैरसमज आहे. लक्षात ठेवले पाहिजे कि ह्या दोन्ही टेस्ट ला जरी काही मर्यादा असल्या तरी ज्याची टेस्ट पॉसिटीव्ह आली तर तो रुग्ण पॉसिटीव्हच असतो !त्यामुळे ताप आल्यास सध्यस्थितीत प्रथम ह्या चाचण्यांना सामोरे गेले पाहिजे. इतर रक्तचाचण्या जसे कि ESR ,CRP आणि लीम्फोसाईट काऊंन्ट हि महत्वांचा असतो.

प्लेटलेट काउंट मात्र कोरोनात नॉर्मल असतो कोरोनाची लागण जर फुफ्फुसापर्यंत झाल्यास एक्स रे व सीटीस्कॅन ची भूमिका निदानकामी महत्वाची असते. कोरोना हि वैश्विक महामारी आहे म्हणजे संपूर्ण जगातील अंदाजे १८० देशांमध्ये ह्याचा गेल्या सात महिन्यापासून प्रार्दुभाव आढळून आला आहे ! आपल्या जिल्ह्यात , तालुक्यात , शहरात , गांवा गावांत व खेड्याखेड्यात कोरोना आता पोहोचला आहे . प्रत्येक जण कंटेनमेंट झोन च्या जवळील भागात राहत आहे ,प्रत्येका चा कोणीतरी मित्र ,आप्त, नजीकच्या काळात कोरोना पॉसिटीव्ह आढळून येत आहे ,त्यामुळे सध्यस्थितीत कुठल्याही रुग्णास ताप आल्यास सर्वप्रथम कोरोनाचा विचार करूनच , कोरोनाची शक्यता आधी पडताळूनच इतर आजारांचा निदान व उपचार कामी विचार करावयास हवा. ह्याचा अर्थ असाही नाही कि मलेरिया, टायफाईड व डेंग्यू कडे दुर्लक्ष करावे कारण भारतात दरवर्षी सुमारे ५ लाख नागरिक ह्या वरील आजारांनी प्रभावित होतात .

आपणास आपले शरीर स्वस्थ व निरोगी ठेवायचे आहे परंतु फक्त कोरोनापासूनच नाही तर इतर वरील आजारांपासून सुद्धा, त्यामुळे कुठलाही प्रकारचा ताप आल्यास किंवा कुठल्याही प्रकारचा बदल शरीरात आढळून आल्यास सतर्क व सजग राहून, भीती न बाळगता नजीकच्या आरोग्य केंद्राकडे अथवा आपल्या फॅमिली फिजिशियनकडे धाव घेऊन सर्वप्रथम कोरोनाचे निदान करून त्याचा संसर्ग असल्यास उपचारास प्राधान्य दिले पाहिजे व अलगीकरण व विलगीकरण पाळले पाहिजे.

चाहूल लागल्यास तापाची
करा तपासणी कोरोनाची

कोरोनाची चाचणी निगेटिव्ह असेल तर डेंग्यू , टायफाईड , मलेरिया अश्या आजारांचा विचार केला पाहिजे. लक्षात ठेवा , कोरोनाच्या आजारात जर पहिले ४ ते ६ दिवस दुर्लक्ष झाले तर मात्र कोरोना ह्या साध्या आजाराचे भयावह अश्या गंभीर कोरोनात रूपांतर होऊ शकते व ज्या नागरिकांचे वय जास्त आहे व ज्यांना कोमोरबीडीटी ( मधुमेह , ह्रदयरोग, उच्च रक्तदाब , दमा , किडनी विकार , कर्करोगग्रस्त , अवयव प्रत्यारोपित व्यक्ती ,कुपोषित व अतिस्थूल व्यक्ती ) आहे अश्यांचा जीव हि धोक्यात येऊ शकतो व उपचारासाठी प्रचंड धावपळ व खर्च हि लागू शकतो. म्हणून “ताप आल्यास दुर्लक्ष करू नका, कोरोनाची चाचणी सर्वप्रथम करा नाहीतर पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही “!


Protected Content

Play sound