नवी दिल्ली: वृत्तसंस्था । वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसच्या सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र, ओडिशा, आंध्रप्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, बिहारसहीत अनेक राज्यांमध्ये कोरोना व्हॅक्सीनची कमतरता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लसीचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. आज सोनिया गांधी यांनी ही बैठक बोलावली असल्याने त्या मुख्यमंत्र्यांशी काय संवाद साधणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. या बैठकीत काँग्रेस शासित राज्यातील सर्व मुख्यमंत्री सामिल होणार आहेत.
सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होण्याबाबत कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ते या बैठकीत सहभागी होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागच्यावेळी सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहिले होते. त्यामुळे आजच्या बैठकीलाही ते उपस्थित राहू शकतात, अशी शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.