वैद्यकीय उपकरण वाटपातही महाराष्ट्रसोबत दुजाभाव – पृथ्वीराज चव्हाण

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारकडून  फक्त लसीबाबतच नाही तर अन्य वैद्यकीय उपकरणांबाबतही महाराष्ट्रासोबत दुजाभाव झाल्याचा आरोप केला आहे.

 

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी राज्यात कोरोना लसीचा मोठा तुटवडा भासत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. राज्यात कोरोना लसीअभावी अनेक लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे.

 

“महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत”, असं ट्वीट करत पृथ्वीराज चव्हाण यांनी एक पत्रक सोबत जोडलं आहे. त्यात केंद्र सरकारकडून अन्य राज्यांना आणि महाराष्ट्राला देण्यात आलेली वैद्यकीय उपकरणांची आकडेवारी चव्हाण यांनी दिली आहे.

 

 

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. पण केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सावत्र आईप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय. ही वागणूक फक्त कोरोना लसीपुरतीच नाही, तर अन्य वैद्यकीय उपकरणांबाबतही महाराष्ट्रासोबत दुजाभाव करण्यात आला आहे. लोकसभेत केंद्र सरकारने राज्यांना देण्यात आलेल्या वैद्यकीय उपकरणांची माहिती दिली. त्या माहितीनुसार आपण विविध राज्यांमधील रुग्णसंख्या आणि त्यांना देण्यात आलेल्या उपकरणांची माहिती घेतली तर धक्कादायक चित्र निर्माण होत असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय.

Protected Content