कोरानाग्रस्तांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम करताय वासुदेव नरवाडे ! ( व्हिडीओ )

रावेर शालीक महाजन । कोरोनाच्या आपत्तीमध्ये बहुतांश राजकारणी व समाजसेवक गायब झालेले असतांना तालुक्यातील विवरे येथील माजी सरपंच तथा पत्रकार वासुदेव नरवाडे हे पात्र हिरीरीने आपल्या गावातील कोरोनाग्रस्तांना धीर देण्याचे काम करत असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे कोरोनामुळे अनेकांना नैराश्य आले असतांना रूग्णांसह त्यांच्या आप्तांना उभारी देण्याचे काम करणार्‍या वासुभाऊंचे करावे तितके कौतुक कमीच आहे.

सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असून या विषाणूचा अगदी ग्रामीण भागातही प्रादूर्भाव आढळून येत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्याला कोरोनाची लागण होऊ नये यासाठी सर्व जण धडपड करत आहेत. तर ज्यांना कोरोनाची बाधा झाली त्यांच्यापासून लोक दूर पळत आहेत. कोरोनाग्रस्तांकडे सर्व भयभीत तसेच हेटाळणीच्या नजरेने पाहत असतात. याच्या अगदी उलट रावेर तालुक्यातील विवरे येथील माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार वासुदेव नरवाडे हे कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत. विवर्‍यात आजवर ३० कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यापैकी २२ पेशंटनी कोरोनावर मात करून ते ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. तर सध्या आठ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील बर्‍या झालेल्या रूग्णांचे जोरदार स्वागत करून त्यांना उभारी देण्याचे काम नरवाडे करत आहेत. याशिवाय, कोरोना बाधीत रूग्णांशी सातत्याने फोनवरून संपर्क करून त्यांचे समुपदेशन करणे, त्यांच्या आप्तांना धीर देणे आदी काम देखील ते करत आहेत.

खरं पाहता, कोरोनाचे नाव येताच अनेकांना धडकी भरते. मात्र वासुदेव नरवाडे हे याला अपवाद ठरले असून या आपत्तीत आपण रूग्णांना उभारी देणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांना अनेक जण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रितीने सावधगिरीचा सल्ला देतात. मात्र माणुसकी हाच खरा धर्म मानणारे वासुभाऊ सातत्याने कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत. अर्थात, यासाठी फिजीकल डिस्टन्सींग, सॅनिटायझेशन, नियमितपणे स्वच्छता आदी बाबी महत्वाच्या असल्याचे ते आवर्जून नमूद करतात.

पहा : कोरोनाग्रस्तांची सेवा करणार्‍या वासुदेव नरवाडे यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ.

Protected Content