कोणत्याही रुग्णाला तपासणीशिवाय परत पाठवू नये ; राज्य सरकारचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) रुग्णालयात आलेल्या कोणत्याही कोविड 19 किंवा नॉन कोविड रुग्णाला तपासणीशिवाय परत पाठवू नये. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या पार्थिवावर 12 तासात अंत्यसंस्कार करा, असे आदेश राज्य सरकारने कोविड19 आणि नॉनकोविड रुग्णांसदर्भात सरकारी, महापालिका आणि खासगी रुग्णालयांसाठी जारी केले आहेत.

 

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने बऱ्याच सरकारी, महापालिका आणि खासगी रुग्णालयात उपचार नाकारले किंवा उशिरा केले जात आहेत, किंवा रुग्णाला दाखल करुन घेण्यात उशीर होतो किंवा अॅम्ब्युलन्स मिळत अशा तक्रारी समोर आल्या होत्या. या गोष्टी लक्षात घेऊन राज्याने आपत्ती व्यवस्था कायदा 2005 आणि साथ प्रतिबंध कायदा 1897 चा वापर करुन हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार कोविड संशयित रुग्णांच्या टेस्ट केल्याच पाहिजेत. 12 तासाच्या आत रिपोर्ट घेणे आणि त्यानुसार पुढील कारवाई झाली पाहिजे, असेही आदेशात म्हटले आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांच्या टप्प्यावर पोहोचली आहे. त्यासाठी राज्य सरकारने विविध महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. 2 मे सकाळी 10 वाजल्यापासून या आदेशाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे.

Protected Content