मुंबई: : वृत्तसंस्था । न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अर्णब यांना अलिबागमधील शाळेत क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. कोठडीत त्यांनी मोबाइल फोनचा वापर केल्याचा आरोप आहे. त्यांच्याकडे कोठडीत मोबाइल फोन आला कुठून, कोणी दिला? याची चौकशी करण्यात येत आहे.
अन्वय नाईक आत्महत्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.
रायगड क्राइम ब्रँचचे तपास अधिकारी जमिल शेख यांनी सांगितले की, गोस्वामी हे कोठडीत असताना शुक्रवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याची व . ते मोबाइल फोनचा वापर करत असल्याची माहिती मिळाली. बुधवारी त्यांचा मोबाइल जप्त करण्यात आला होता. अलिबागमधील तुरुंग अधीक्षकांना यासंबंधी पत्र लिहिले. गोस्वामी यांच्याकडे मोबाइल फोन आला कुठून याचा तपास करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली, अशी माहितीही त्यांनी दिली.
गोस्वामी यांना रविवारी तळोजा कारागृहात नेण्यात येत होते. त्यावेळी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला. पोलीस व्हॅनमध्ये ते जोरजोरात ओरडून मारहाण झाल्याचे सांगत होते. मला जबरदस्ती तळोजा कारागृहात नेण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. ‘माझ्या जीवाला धोका आहे. कोर्टाला सांगा की मला मदत करा,’ असे ते व्हॅनमध्ये असताना ओरडून सांगत होते. मला वकिलांना भेटायचे आहे असे सांगितले तर, तुरुंग अधीक्षकांकडून मला मारहाण करण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला.