कोचूर, चिनावल परिसरात वादळी पावसामुळे नुकसान; अनेक गावात वीज गायब

सावदा प्रतिनिधी । शनिवारी झालेल्या कोचूर, चिनावल, वडगाव, कुभारखेडा रोझोदा सावखेडा परिसरात संध्याकाळी ६ वाजता जोरदार झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कोचूर, चिनावल वडगाव, कुंभार खेडा, रोझोदा, सावखेडा, कळमोदा, शेती शिवारात काल झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाच्या झटक्याने एका क्षणात हिरावला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

ऐन पोटरीत तसेच कापणीच्या मार्गावर असतानाच कालच्या पावसाने व वादळाने ज्वारी, मका व केळी कपाशी अक्षरक्षहा उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने या नुकसानीची त्वरित दखल घेवून पंचनामे करावे व शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनकडून मागणी होत आहे. मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील व रावेर मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी यांनी नुकसान ग्रस्त शेताची पाहणी करत प्रांत अधिकारी अजित थोरबोले यांना सरसकट पंचनामा करा कोणताही शेतकरी वंचित राहु नये अशा सूचना केल्या

अनेक गावात विजपुरठा गायब
अतिशय वेगाने आलेल्या वादळी वाऱ्यामुळे व पावसाळ्यामुळे मोठे वृक्ष यांसह विजेचे खांब उन्मळून पडल्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित आहे उशिरा रात्रीपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम चालू होते.

केळी उत्पादकांचे कंबरडे मोडले
उत्पादकांना याआधीच आपली केळी कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर कमी भावात विक्री करावी लागली आहे. त्यात सिएमव्ही व्हायरसने नवीन लावलेली केळी उपटून ठेवावी लागत आहे. काही प्रमाणात शेतात केळी शिल्लक असल्याने तिला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा मोठ्या पल्लवीत झाल्या होत्या, परंतु काल संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतात थोड्याफार प्रमाणात शिल्लक राहिलेली केळी सुद्धा जमीनदोस्त झाली आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांचे पुरते कंबरडेच मोडले आहे. यावेळी कोचुर येथील शालीग्राम पाटील, कमलाकर पाटील, सुभाष पाटील, प्रशांत पाटील, मंगेश पाटील यांचेसह मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

      मदत व पुनर्वसन खात्याचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याशी फोनवर चर्चा केली असून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहे व जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना मिळावी म्हणून सांगितले आहे.
                                                             – आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर

 

      केळी उत्पादक शेतकर्याच वादळी वार्यासह पाऊसामुळे काल लाखो रुपयाच नुकसान झालेले आसुन त्वरीत पंचनामा करुन भरपाई मिळावी
                                                            -कमलाकर रमेश पाटील, शेतकरी

Protected Content