‘विद्यापीठातील ऑनलाईन परिक्षेच्या बिलाची होणार चौकशी’ : कुलगुरूंची घोषणा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील गाज असलेल्या ऑनलाईन परिक्षेसाठी अदा करण्यात आलेल्या बिलांची त्रयस्थ समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा आज कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्‍वरी यांनी केली. आज झालेल्या अधिसभेच्या बैठकीत या मुद्यावरून काही सदस्यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

या संदर्भातील वृत्त असे की, ‘कोरोना काळात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने घेतलेल्या ऑनलाईन परिक्षेसाठी अदा करण्यात आलेले बील हे वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. आधी देखील अनेकांनी याबाबत आरोप केले आहे. आज कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्‍वरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिसभेतही हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला.

आज अर्थसंकल्पासाठी अधिसभेचे आयोजन करण्यात आले. यात आधी ९ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या अधिसभेच्या सभेचे सभावृत्त कायम करण्याच्या विषयावर चर्चा सुरू झाली त्यावेळी अधिसभा सदस्यांनी परिक्षेच्या देयकाचा मुद्दा उपस्थित केला. अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे, प्रा.एकनाथ नेहेते, प्रा.अनील पाटील, प्रा.गौतम कुवर, प्रा.के.जी.कोल्हे, नितीन ठाकूर, अमोल पाटील, प्रकाश पाठक आदींनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. यावर कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी या देयकाची चौकशी करण्यासाठी त्रयस्थ समिती नेमली जाईल अशी घोषणा केली. यासोबत भविष्यात कोटेशन किंवा टेंडर मागवूनच याचे कंत्राट दिले जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

दरम्यान सकाळी बैठकीत कुलगुरू प्रा.माहेश्वरी तसेच इतरांच्या अभिनंदनाचे ठराव मांडल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करतांना प्रा.माहेश्वरी यांनी उच्च शिक्षणातील नव्या बदलांची नोंद घेत ती परिभाषा आत्मसात करताना शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी विशेषत: विद्यापीठाच्या सर्वोच्च अशा अधिसभेने प्रयत्न करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले.

प्रा.माहेश्वरी यांच्याकडून विद्यापीठाला विकासाची दिशा प्राप्त होईल अशी अपेक्षा अधिसभा सदस्यांनी व्यक्त केली. अधिसभेत मार्गदर्शन करताना प्रा.माहेश्वरी म्हणाले की, माझ्याकडून अनेक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे सजग राहून काम करण्याची जबाबदारी वाढली आहे. पारंपारिक विद्यापीठांपुढे  खाजगी विद्यापीठांचे मोठे आव्हान उभे आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे अशी सामान्य लोकांची अपेक्षा आहे. अशा स्थितीत शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मानसिकता बदलावी लागणार आहे. दरम्यान कुलगुरू प्रा.माहेश्वरी यांनी ऑफलाईन परीक्षा घेण्याचा जो निर्णय जाहीर केला आहे. त्या बद्दल अधिसभेच्या सर्व सदस्यांनी एकमताने या निर्णयाचे बैठकीत स्वागत केले.’

दरम्यान, या बैठकीत डॉ. माहेश्वरी यांच्या सोबतच उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठात जनता दरबार घेऊन अनेक प्रश्न मार्गी लावले तसेच बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा उभारण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील निधी जाहीर केल्याबद्दल या दोघांचे अभिनंदन करण्यात आले. तर खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी दिवस हा ‘लेवा गणबोली दिवस’ म्हणून साजरा केला जावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा.के.एफ.पवार, माजी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी.व्ही. पवार, परीक्षा विभागाचे संचालक प्रा.डी.एस.दलाल, सर्व प्रभारी अधिष्ठाता तसेच रासेयोचे संचालक प्रा. सचिन नांद्रे, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. सुनील कुलकर्णी यांचेही अभिनंदनाचे ठराव मांडण्यात आले.

अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे, नितीन ठाकुर, प्रा.के.जी.कोल्हे, प्रा.एकनाथ नेहते, प्राचार्य एल.पी.देशमुख, अमोल मराठे, नितीन झाल्टे, प्रा.अनील पाटील, प्रा.गौतम कुवर, मनिषा चौधरी, दिनेश नाईक, सुरेश पवार, प्रा.प्रकाश अहिरराव, प्रा.सुनील गोसावी, विवेक लोहार, अमोल सोनवणे आदींनी ठरावाच्या चर्चेत भाग घेतला. विद्यापीठाच्या विविध विषयांच्या झालेल्या चर्चेत डॉ.सतिष पाटील, राजेंद्र नन्नवरे, प्रकाश पाठक, प्राचार्य एस.आर.जाधव आदींनी भाग घेतला.

दुपारच्या सत्रात प्रश्नोत्तराच्या तासात प्रा.एकनाथ नेहते, प्रा.अजय सुरवाडे, नितीन ठाकूर, अॅड संदीप पाटील, विष्णू भंगाळे, दिनेश नाईक, अमोल मराठे, अमोल सोनवणे, डॉ.के.जी.कोल्हे, मनिषा चौधरी, प्रा.अनिल पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रा.एस.आर.चौधरी, डॉ.महेश घुगरी, विवेक लोहार, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्रा.मोहन पावरा, प्रा.प्रिती अग्रवाल, दीपक पाटील, प्राचार्य पी.पी.छाजेड, प्राचार्य राजू फालक, प्राचार्य आर.एस.पाटील यांनी उत्तरे दिली.

प्रभारी कुलसचिव प्रा.के.एफ.पवार यांनी बैठकीचे सुत्रसंचालन केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!