कोकणावर संकट कायम, पुढचे 3 दिवस धोक्याचे

 

मुंबई: वृत्तसंस्था ।   मुंबई वेधशाळेनं आज दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात पुढचे 3 दिवस, खास करून कोकणात व मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

महाराष्ट्रात मान्सूनच्या मुसळधार पावसानं दाणादाण उडवली आहे. सोमवार पासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

 

हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं आज म्हणजेच 23 जुलैसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला रेड अ‌ॅलर्ट दिला आहे.  मुंबई, पालघर आणि ठाणे, यतवमाळ आणि चंद्रपूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. विदर्भातील उर्वरित सर्व जिल्हे, आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

 

हवामान विभगानं उद्यासाठी सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. तर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. रविवारसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

 

मुंबई वेधशाळेनं जारी केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात सोमवारपासून पावसाचं प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे राज्याला थोडासा दिलासा मिळू शकतो.

 

राज्यात आजही पावसाचं धुमशान सुरुचं आहे. कोकण, गोवा, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात विशेषता रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुढचे तीन ते चार तास मुसळधार पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे.  सांगली, सोलापूर, बीड, औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्यातही पाऊस होऊ शकतो.

 

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये गेल्या 48 तासात 1074.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.  दुपारपर्यंत महाबळेश्वरमध्ये 142 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

 

सांगली जिल्ह्यात तीन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत.तर या पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील 25 ठिकाणा वरील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.ज्यामध्ये 8 राज्यमार्ग आणि 18 जिल्हा मार्गांचा समावेश आहे. यामध्ये शिराळा,पलूस मिरज आणि वाळवा तालुक्यातील रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे.त्या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली असून अन्य मार्गावरून ही वाहतूक वळविण्यात आली आहेत.

 

वाशिम जिल्ह्यात  मालेगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंमानी ते पांगरी नवघरे कडे जाणाऱ्या रस्त्यावर पांगरी नवघरे गावानजीक पुलांची उंची कमी असल्याने,या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या दोन्ही गावातील नागरिकांना जीव मुठीत धरून पाण्यातून जावं लागतं आहे.

 

Protected Content