मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केळी पिकावर कुकुंबर मोझॅक व्हायरस (सिएमव्ही) या विषाणू जन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला होता त्यावर काय उपाययोजना केल्या व बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत गेल्या पावसाळी अधिवेशनात एकनाथराव खडसे यांनी प्रश्न विचारला होता. त्याला कृषी मंत्री अब्दुल सत्तारयांनी उत्तर दिले होते. परंतु त्यावर अद्यापही कोणतीही उपाययोजना न झाल्यामुळे एकनाथराव खडसे यांनी अर्थसंकल्पिय अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित केला.
यावेळी एकनाथराव खडसे म्हणाले, जळगाव जिल्हयात ४५ हजार हेक्टरवर केळीचे पिक घेतले जाते, केळी पिकावर चार महिन्यांपूर्वी कुकुंबर मोझॅक व्हायरस (सिएमव्ही) या विषाणू जन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. प्रादुर्भाव झालेल्या रावेर तालुक्यातील क्षेत्राची १७ सप्टेंबर २०२२ रोजी केंद्रीय किड व्यवस्थापन पथकाने पाहणी केली. सीएमव्ही मूळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन नुकसान भरपाई देईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती. परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसुन नुकसानभरपाई देण्याऐवजी मंत्रिमंडळ बैठकीत नविन रोपांच्या लागवडीसाठी अनुदान देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचाराधीन आहे का? तसेच टिश्यू कल्चर केळी रोपांची निर्मिती बि-बियाणे गुण नियंत्रण अधिनियमाअंतर्गत समावेश करून केळी उत्पादकाच्या हिताचा निर्णय घेण्यात येणार आहे का? आणि सिएमव्ही रोगाचे प्रतिबंधात्मक व निर्मूलनात्मक उपाययोजने बाबत कोणती कार्यवाही करण्यात येणार आहे, असा प्रश्न एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद सभागृहात उपस्थित केला.
त्यावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर देताना सांगितले, जळगाव जिल्हयात केळीवर कुकुंबर मोझॅक व्हायरस(सि एम व्ही) या विषाणू जन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला होता त्याची केंद्रीय पथकाकडून पाहणी झाली. सिएमव्ही प्रादुर्भावाने बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्यात आले असुन सिएमव्ही किडीच्या प्रादुर्भावाने केळीच्या क्षेत्राचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याऐवजी केळी पिकाची नविन लागवड करण्यासाठी केळीच्या नवीन रोपांवर अनुदान देण्या बाबत प्रस्ताव महसुल व वन(मदत पुनर्वसन)विभागास पाठविण्यात आलेला आहे. टिश्यू कल्चर केळी रोपांची विक्री करण्यासाठी बियाणे कायद्याच्या अंतर्गत परवाना दिला जातो. सीएमव्ही रोगाचे प्रतिबंधात्मक व निर्मूलनात्मक उपाययोजनेची कृषी विभागामार्फत कृषी विस्तार माध्यमाद्वारे कार्यवाही करण्यात आली आहे