नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रात असणारे मोदी सरकार युवकांना रोजगार देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक महत्त्वाचे आश्वासन दिले आहे. जर केंद्रात काँग्रेसचे सरकार आले तर एका वर्षाच्या कालावधीत 22 लाख युवकांना सरकारी नोकरी देण्यात येईल. पुढील वर्षाच्या 31 मार्च 2020 पर्यंत 22 लाख सरकारी पदे भरण्यात येतील, असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी येत्या ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केलेले ट्विट महत्त्वाचे मानले जात आहे. ‘सध्या देशात विविध खात्यातील २२ लाख पदे रिक्त आहेत. आमची सत्ता आल्यास ३१ मार्च २०२० पर्यंत ही सर्वच्या सर्व २२ लाख पदे भरण्यात येतील,’ असे राहुल यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारकडून आरोग्य आणि शिक्षणासाठी निधी हस्तांतरीत केला जातो. त्याच्याशी ही सर्व रिक्तपदे लिंक करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.