केंद्रशासित लडाख चीनला अमान्य

बीजिंग वृत्तसंस्था । एकीकडे भारतासोबत चर्चा करायची आणि दुसरीकडे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताविरोधात हजारो सैन्य आणि क्षेपणास्त्रे तैनात करणाऱ्या चीनने आता आणखी एक वक्तव्य केले आहे. भारताने लडाखला केंद्रशासित राज्याचा दर्जा दिला असला तरी चीनची त्याला मान्यता नसल्याचे चीनने म्हटले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताने लडाख राज्याची स्थापना बेकायदेशीरपणे केली असल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकारने मागील वर्षी जम्मू-काश्मीर राज्याला दिलेला विशेष राज्याचा दर्जा काढला. त्यानंतर जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन करून मागील वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी लडाख केंद्रशासित राज्याची स्थापना केली. भारताने उचललेल्या या पावलामुळे चीन भडकला असल्याची चर्चा आहे.

चीनने लडाख पूर्वमध्ये भारताच्या भूभागावर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे म्हटले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबीन यांनी लडाखची स्थापना अवैधपणे केली असल्याचे म्हटले आहे. चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून कधीच मान्यता देणार नसल्याचे त्यांनी म्हटले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ वादग्रस्त असणाऱ्या भागात भारताने उभारलेल्या पायाभूत सुविधांनाही आम्ही विरोध करत असल्याचे त्यांनी म्हटले.

भारत-चीन दरम्यानच्या चर्चेबाबत त्यांनी सांगितले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ, सीमाभागातील परिस्थिती आणखी तणावपूर्ण होईल, असे कोणतेही पाऊल दोन्ही देश उचलणार नाहीत यावर एकमत झाले असल्याचे त्यांनी सांगितले. भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा भागात बांधकाम करण्यास चीनचा विरोध असल्याचे त्यांनी म्हटले.

भारत आणि चीनमध्ये मागील पाच महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यात हिंसक संघर्ष झाल्यानंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे.

Protected Content