कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

जळगाव प्रतिनिधी । जागतिक बँक अर्थसहाय्यीत कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 7 वर्षे कालावधीत अंमलबजावणीकरीता शासनाची मान्यताप्राप्त आहे. कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

राज्यातील अल्पभुधारक शेतकरी व कृषि नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून समावेशक आणि स्पर्धात्मक शेतमाल मुल्यसाखळयांच्या विकासाला मदत करणे हे स्मार्ट प्रकल्पाचे उद्दिष्ट्य आहे. ते साध्य करण्यासाठी उत्पादक आणि उद्योजकांना नवीन व संघटीत बाजारपेठेत प्रवेश मिळवुन देण्यासाठी आवश्यक ते तांत्रिक सहाय्य, पायाभुत सुविधा आणि जोखिम निवारण क्षमता विकसीत करण्यासाठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत पारंपारीक कृषि व्यवस्थेचे बळकटीकरण करुन ती अधिकाधिक बाजाराभिमुख बनवणे आणि मुल्यसाखळीतील खाजगी क्षेत्राचा सहभाग अधिक व्यापक करणे यावर भर असणार आहे.

स्मार्ट प्रकल्पांतर्गत समुदाय आधारीत संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज हे शेतमाल, शेळ्या आणि परसबागेतील कुक्कूटपालन यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पांसाठी आहेत. मुल्यसाखळी विकासाचे उत्पादक भागीदारी उपप्रकल्प (productive partnerships) आणि बाजार संपर्क वाढ (Market Access plan) उपप्रकल्पासाठी सदर अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारित संस्थांमध्ये आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाव्दारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र यांचा समावेश आहे. गट/शेतकरी उत्पादक कंपनी पात्रतेचे निकष पुर्ण करते किंवा नाही याचा फारसा विचार न करता भविष्यात पात्रतेचे निकष पुर्ण करण्याच्या अधीन राहुन अर्ज सादर करण्यात यावा.

अर्ज सादर करण्यासाठी पात्र खरेदीदारांमध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील कॉर्पोरेट्रस/प्रक्रियादार/लघु, मध्यम उद्योजक/स्टार्टअप्स/कोणताही खरेदीदार इ. चा समावेश आहे. त्यानुसार प्राप्त होणाऱ्या अर्जापैकी पात्र स्पर्धात्मक व उत्कृष्ठ अर्जाना प्रकल्पाचे 60% पर्यत अनुदान उपलब्ध होईल. अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना इ. माहिती http://www.smart_mh.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या प्रकल्पासाठी अर्ज मागविण्याची अंतिम मुदत दि. 15 डिसेंबर, 2020 होती. परंतु शेतकऱ्यांची आणि खरेदीदार संस्थांची मागणी लक्षात घेवून अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली असुन आता अर्ज करण्याची अंतीम दिनांक 31 डिसेंबर, 2020 अशी राहणार आहे. तरी इच्छुकांनी अर्ज दि. 31 डिसेंबर, 2020 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत स्मार्टच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत. असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

Protected Content