टोकियो : वृत्तसंस्था । भारतीय कुस्तीपटू रवी दहिया आणि दीपक पूनिया यांनी ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
दोघांनिही आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर चुरशीच्या सामन्यामध्ये विजय मिळवत कुस्तीमध्ये भारताला पदक मिळवण्याच्या आशा पल्लवित केल्या आहेत. दीपकने तर अगदी शेवटच्या सेकंदामध्ये आपल्या चीन प्रतिस्पर्धकाला धोबीपछाड देत सामना जिंकला.
५७ किलो वजनी गटामध्ये रवी दहियाने बुल्गेरियाच्या वॅलिंटिनोवचा १४-४ असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीलाच रवीने वॉलिंटिनोववर ६-० ची आघाडी मिळवली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली. रवीने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली. रवीच्या डावपेचांसमोर बुल्गेरियन कुस्तीपटू फारच फिका पडल्याचं चित्र सामन्यामध्ये दिसलं.
दुसरीकडे रवी दहियाचा सामना सुरु असतानाच ८६ किलो वजनी गटामध्ये दीपक पूनियाने अगदी रोमहर्षक सामन्यात शेन नावाच्या चिनी प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. दीपकने सामन्यातील पहिली गुण जिंकल्यानंतरही चिनी प्रतिस्पर्धी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र दीपकने त्याचे सर्व डावपेच हाणून पाडले आणि शेवटच्या सेकंदामध्ये निर्णयाक आघाडी मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. अगदी शेवटच्या काही सेकंदांमध्ये दीपकने टाकलेला डावपेच न समजल्याने शेन पराभूत झाला. सामना संपला तेव्हा स्कोअरकार्ड ६-३ असं होतं.
टोक्यो ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने अंतिम फेरीत धडक मारली आहे. पात्रताफेरीमधील कामगिरीच्या जोरावर नीरजला थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आलाय. पुरुष भालाफेक स्पर्धेमध्ये ८३.५० मीटरपर्यंत भाला फेकणाऱ्या किंवा सर्वोत्तम १२ खेळाडूंना प्रवेश अंतिम फेरीत प्रवेश दिला जातो. नीरजने पात्रता फेरीमध्ये फेकलेला भाला तब्बल ८६.६५ मीटरपर्यंत गेला आणि तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. नीरजने ही कामगिरी पहिल्याच प्रयत्न केली. फिनलॅण्डच्या लेस्सी इतीलातोलोसुद्धा अशाचप्रकारे अंतिम फेरीमध्ये गेलाय. ऑलिम्पिक स्टेडियममध्ये ७ ऑगस्ट रोजी पुरुष भालाफेक स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे.
युवा भारतीय कुस्तीपटू सोनम मलिकचे ऑलिम्पिक पदार्पण पहिल्याच फेरीत पराभवामुळे संपुष्टात आले. ६२ किलो वजनी गटात मोंगोलियाच्या बोलोर्टुया खुरेलखूने तिला पराभूत केले. १९ वर्षीय सोनमने २-० अशी आघाडी घेतली. पण ३५ सेकंदांत बोलोर्टुयाने बरोबरी साधली. ही गुणसंख्या उत्तरार्धापर्यंत कायम राहिली. पण अखेरच्या प्रयत्नात बोलोर्टुयाने दोन गुण मिळवत विजय प्राप्त केला. बरोबरी झालेल्या लढतीत एकाच प्रयत्नात अधिक गुण मिळवणारा कुस्तीपटू विजयी होतो. सोनम ही बोलोर्टुयापेक्षा सरस कुस्तीपटू आहे. परंतु अतिबचावात्मक खेळाचा तिला फटका बसला. तिने या लढतीत बºयाच चुका केल्या. परंतु किशोरवयातच ऑलिम्पिक स्तराचा घेतलेला अनुभव तिला भविष्यात उपयुक्त ठरेल, असं मत तिचे प्रशिक्षक अजमेर मलिक यांनी व्यक्त केलं.