कुत्रे खाण्यावरून वादंग : अखेर बच्चू कडूंनी मागितली माफी !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आसामातील लोक कुत्रे खात असल्याचे वक्तव्य आमदार बच्चू कडू यांना भोवणार असल्याचे चिन्ह दिसताच त्यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे.

 

या संदर्भातील वृत्त असे की, माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर बोलताना आसाममध्ये लोक कुत्रे खातात असं वक्तव्य केलं. यावरून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. सोडल मीडियात तर यावरून मोठे चर्वण झाले. मात्र प्रसारमाध्यमांमधून ही माहिती आसाममध्ये पोहचल्यानंतर तिथे यावरून अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

 

बच्चू कडू यांच्या या वक्तव्यामुळे आसाम विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कडू यांच्या वक्तव्यावरून मोठा गोंधळ झाला. कॉंग्रेस आमदार कमलाख्या डे पुरकायस्थ यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्यासह विरोधी पक्षातील आमदारांनी हे वक्तव्य करणार्‍या बच्चू कडूंना अटक करा, अशी मागणी केली.

 

यामुळे बच्चू कडू यांनी अखेर माफी मागितली आहे. बच्चू कडू म्हणाले, नागालँडमधील लोक कुत्रे खातात. मला वाटलं आसाममधील लोक कुत्रे खातात. दोन्ही राज्ये जवळपासच आहेत. माझ्याकडून चुकून आसाम नाव घेतलं गेल, तिथं नागालँड म्हणायला हवं होतं. एवढीच माझी चूक आहे. यामुळे त्या राज्यातील लोकांच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मी माफी मागतो.

Protected Content