नवी दिल्ली वृत्तसंस्था । काही लोकांसाठी कुटुंब हाच पक्ष असल्याचे वक्तव्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशावर टीका केली आहे.
काँग्रेसने प्रियंका गांधी यांना काँग्रेसचे सरचिटणीस पद देण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी लागलीच प्रतिक्रिया नोंदवली आहे. प्रियंका गांधी यांचे नाव न घेता त्यांनी काही लोकांसाठी परिवारच पक्ष असतो, असे म्हटले. महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, काही लोकांसाठी परिवारच पक्ष आहे. आमच्यासाठी पक्ष हा परिवार आहे. आमचा विरोध काँग्रेसच्या संस्कृतीला आहे. काँग्रेसमुक्त देश याचा अर्थ काँग्रेसमुक्त संस्कृती असल्याचे ते म्हणाले.
एकीकडे प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील आगमनामुळे काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. तर भाजपने मात्र राहूल गांधी अयशस्वी झाल्यामुळेच प्रियंकांना राजकारणात लाँच करण्यात आल्याची टीका केली आहे. या पाठोपाठ खुद्द पंतप्रधानांनीही काँग्रेसमधील घराणेशाहीवर टीकास्त्र सोडले आहे.