नवी दिल्ली: वृत्तसंस्था । केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी तर कोणती तर काही अदृश्य शक्तीमुळेच शेतकरी आंदोलनावर तोडगा निघत नसल्याचा दावा केला. मात्र, ही अदृश्य शक्ती कोणती? हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
शेतकरी आंदोलनाला ६० दिवस पूर्ण होऊनही कोणताच तोडगा निघालेला नाही. त्यातच २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे धाबे दणाणले आहेत.
शेतकरी आंदोलनाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्रसिंह तोमर यांनी मीडियाशी संवाद साधून हा आरोप केला. कोणती तरी अदृश्य शक्ती आहे. त्यांनाच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघू नये असं वाटतं. नाही तर आमच्याशी चर्चा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांनी वेगळाच राग अळवला नसता, असा दावा तोमर यांनी केला.
शेतकऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने नोटीस बजावली आहे. त्यावर तोमर यांना पत्रकारांनी छेडले असता कोणत्याही गोष्टीचा शेतकरी आंदोलनाशी संबंध लावू नका, असं ते म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं हे आमचं काम आहे. शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास आम्ही नेहमीच तयार आहोत. जेव्हा पंजाबमध्ये शेतकरी रेल्वेरुळावर उतरून आंदोलन करत होते, तेव्हापासूनच त्यांच्याशी चर्चा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांच्या प्रतिष्ठेला कोणतीही ठेच पोहोचणार नाही, याची आम्ही काळजी घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.
२६ जानेवारी हा आपला राष्ट्रीय उत्सव आहे. आंदोलनासाठी ३६५ दिवस पडले आहेत. शेतकरी त्यांच्या रॅलीची ताकद कधीही दाखवू शकतात. त्यामुळे २६ जानेवारी रोजी त्यांनी रॅली काढणं योग्य नाही. शेतकऱ्यांनी इतर कुठल्या तरी दिवशी रॅलीचं आयोजन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं. शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला रॅलीचं आयोजन केलं तरी या आंदोलनात शिस्त पाळली जाईल, याची मला खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच सरकारला कोणताही ईगो नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.