भोपाळ : वृत्तसंस्था । मध्य प्रदेशात कालव्यात बस कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३२ प्रवाशांनी जीव गमावला आहे. अनेक प्रवाशांचे मृतेदह वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अपघातातून सात जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे. पहाटे ७.३० वाजता झालेल्या या अपघातात जवळपास ६० प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळली होती.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. स्थानिकांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. घटनास्थळी डॉक्टर आणि रुग्णवाहिकादेखील पाठवण्यात आल्या होत्या अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. “ही अत्यंत दुख:द घटना आहे. बचावकार्य आधीच सुरु आहे. दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत दिली जाणार आहे. संपूर्ण राज्य पीडितांच्या दुखात सहभागी आहे,” असं शिवराज सिंग यांनी व्हिडीओ मेसेजमध्ये म्हटलं आहे.
दुर्घटनेनंतर राज्य सरकारने सर्व महत्वाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. यामधील एका कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहणार होते. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या एक लाख घरांच्या लाभार्थ्यांसोबत अमित शाह सकाळी ११ वाजता संवाद साधणार होते.
चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. बस सतनाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर सात प्रवासी पोहत बाहेर आले. कालवा ३० फूट खोल असल्याने पूर्ण बसच त्यात बुडाली होती. क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचं काम सुरु करण्यात आलं होतं. बसचा शोध घेताना अडथळे येत असल्याने बाणसागर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग रोखण्यात आला होता. सध्या ३२ मृतदेह हाती लागले असून इतरांचा शोध सुरु आहे. काही मृतदेह पाण्यासोबत वाहून गेल्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.