जामनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक येथे काहीही कारण नसताना एका तरुणाला मोहिनी हॉटेल समोर फायटरने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. जखमी झालेल्या तरुणाला जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक येथे राहणारे रवींद्र बाळासाहेब बेलदार (वय-३२) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरुवार २० एप्रिल रोजी रात्री ८ वाजता रवींद्र बेलदार हे गावातील मोहिनी हॉटेल समोर उभे असताना आकाश वाल्मीक कुमावत (वय-३२) आणि इतर अनोळखी चार जणांनी काहीही एक कारण नसताना रविंद्र बेलदार याला फायटरने डोक्यावर व डोळ्यांवर बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. जखमी झालेल्या रविंद्र याला खाजगी वाहनातून जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या संदर्भात रवींद्र बेलदार याने दिलेल्या जबाबावरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर ही तक्रार पोलीसांनी जामनेर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन पाटील करीत आहे.