काय आहे सोशल डिस्टन्सींगचे गुपित ? (ब्लॉग)

कोरोनाच्या लढ्यात अगदी सुरवातीपासून पंतप्रधान मोदी हे तळमळीने सोशल डिस्टन्सींग बद्दल सांगत आहेत, पण वस्तुतः डिस्टन्सींगचा कोरोना किंवा अन्य कोणत्याही आजाराशी काहीएक संबंध नाही. मग सोशल डिस्टन्सींगचे आवाहन करणारे चुकत आहेत का? तर मुळीच नाही ! या शब्दाचा वापरच समाजाचे शक्ती संबंध समजावण्यासाठी करण्यात येतो. कोरोनाच्या फैलावाचा संबंध फिजिकल डिस्टन्सिंग म्हणजेच शारीरिक दुराव्याशी आहे. म्हणजे आजारी व्यक्तीच्या शरीरापासून दूर राहण्याशी! तुमचा आजार दुसर्‍याला देऊ नका आणि दुसर्‍याचा आजार तुम्ही घेऊ नका! सोशल डिस्टनसिंगच्या साहायाने आपण अप्रत्यक्षपणे फिजिकल डिस्टनसिंग करत असतो.

हा शारीरिक दुरावा ठेवण्याचा काळ आहे. सोबतच हा सामाजिक आणि कौटुंबीकदृष्ट्या एकजूट होण्याचाही काळ आहे. शारीरिक दुरावा राखा आणि सामाजिकदृष्ट्या ऐक्य अबाधित राखा, असा अर्थ आपण घ्यायचा असतो. सोशल डिस्टन्सींगच ही संसर्गजन्य आजार रोखण्याची एक अचिकित्सकीय प्रक्रिया आहे. आजाराचा फैलाव रोखणे अथवा संसर्गाचा वेग कमी करता यावा म्हणून संसर्ग झालेले लोक आणि संसर्ग न झालेले लोक यांच्यातील संपर्क थांबवणे किंवा कमी करणे हा सोशल डिस्टन्सींगचा उद्देश आहे.

सोशल डिस्टन्सिंगमुळे आजाराचा फैलाव आणि त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यात मदत मिळते.

लोकांनी विनाकारण एकमेकांच्या संपर्कात किंवा जवळ राहू नये, निष्कारण घराबाहेर पडू नये, हस्तांदोलन अथवा गळाभेट टाळावी म्हणजे कोरोना विषाणूचा फैलाव होणार नाही, असा वर्तमान संदर्भात याचा अर्थ सांगितला जाऊ लागला आहे. पण, जागतिक आरोग्य संघटना ( डब्ल्यूएचओ) संसर्ग रोखण्यासाठी दुरावा राखण्याच्या उपायांसाठी फिजिकल डिस्टन्सिंग शब्दाचा प्रयोग करते.

प्रारंभी सोशल डिस्टन्सींग हा शब्द वापरला जात होता हे खरे, परंतु त्यावर काही वाद होते. त्यामुळे आता डब्ल्यूएचओ सोशल डिस्टन्सींग शब्द अजिबात वापरत नाही. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अदनोम घेब्रेयसस हेही आपल्या ट्विटमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगच लिहित आहेत.

मुळात शब्द काहीही वापरला तरी त्यामागील हेतू एकच आहे.

समाज व्यवस्थेचा भाग

खरं पाहिलं तर सोशल डिस्टन्सिंग हा भारतीय समाज व्यवस्थेचा जुना भाग आहे. आधी जातीच्या माध्यमातून विविध समुदायांमध्ये सोशल डिस्टन्सींग असे. मासिकपाळीच्या काळात स्वयंपाक वर्ज्य करण्यात आला होता. या कालावधीत उपासनागृहांमध्ये जाण्यासाठी अटकाव केला जातो. आजच्या युगात या बाबींवर टीका करण्यात येत असली तरी आधी हे डिस्टन्सींग पाळले जात असे हे वास्तव आहे.

गरीब आणि श्रीमंतातील सोशल डिस्टन्सिंग

कोण किती श्रीमंत आहे. (मग तो कितीही वाईट असला तरी फरक पडत नाही) कोणाची लायकी काय आहे, यावरच सामाजिक संबंध निर्धारित होतात. आमच्या मुलांनी कोणाच्या मुलांसोबत खेळले पाहिजे, कोणासोबत शाळेत गेले पाहिजे या सर्वच गोष्टी सोशल डिस्टन्सिंगच निश्‍चित करते. खेड्यांमध्ये मजुरांसाठी वेगळी भांडी ठेवणे आणि शहरांतही त्याच्याशी दुरावा राखूनच वागणे हाही सोशल डिस्टन्सिंगचाच परिणाम आहे. ज्या देशात जात, धर्म, लिंग, आर्थिक स्थिती आदींच्या आधारावर सामाजिक दुरावा केला जातो, तेथे त्या लोकांना एकत्र येण्याचा विश्‍वास फक्त संविधानाने दिला आहे. आज आपण समान अधिकारांच्या जगात जगत आहोत. येथे कुणीही भेदभाव करू शकत नाही. असो, हा विषय खूप विस्तृत आणि गहन आहे.

सध्यातरी सोशल डिस्टन्सींग किंवा फिजिकल डिस्टन्सींग ही अतिशय महत्त्वाची आहे. पण, एखादं संकट आलं की सामान्य माणूस अचानक अत्यंत भयाकूल व असुरक्षित भावनेने जगतांना दिसतो. अशावेळी विचारांपेक्षा भावना वरचढ ठरतात व तो चुका करतो व इतरांचा तिरस्कार करतो किंवा विशिष्ट कुटुंब वा समुदायावर बहिष्कार करतो… भावनेच्या प्रवाहात या चुका टाळा.

आज कोणी कोरोनाची संशयित आहे किंवा होम क्वारंटाइन असलेल्या एखाद्या कुटुंबाला समाजातून गुन्हेगारांप्रमाणे वागणूक मिळतेय. परिणामी पॉझिटिव्ह मंडळी आपली माहिती लपवून ठेवण्याला प्राधान्य देत आहेत. हे कुटुंबासह समाजासाठीही घातक आहे. या कठीण प्रसंगात समाज, शेजारी म्हणून आपण त्यांच्यामागे भक्कमपणे उभे राहायला हवे. त्यांना मानसिक आधार द्यायला हवा. उद्या कोणाची वेळ येईल हे सांगता येत नाही.

nilesh gore

निलेश गोरे,
हिप्नॉथेरपीस्ट आणि सायकॉलॉजीकल काउंसलर,
वेलनेस फाउंडेशन, नवशक्ति आर्केड,
जामनेर रोड, भुसावळ.
९९२२८५१६७८

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content