कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट : संजय गरुड यांचा आरोप

शेंदूर्णी, प्रतिनिधी । कोरोना आपत्तीमुळे असलेल्या लॉकडाउन काळात खाजगी व्यापारी कापूस घेत नसल्याने सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांना आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय पर्याय नसल्याने सीसीआय ग्रेडर व जिनिंग मालक मनमानी करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

संजय गरुड यांनी पत्रकार परिषदेत यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या कापूस वजनाच्या वेळी कुठल्याही प्रकारची कट्टी लावू नये म्हणुन आदेश पारित केले आहेत. पण या आदेशाला येथील केंद्र प्रमुखाने केराची टोपली दाखविली असल्याचे दिसून येत आहे. तसेच न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन झाल्याचे दिसू नये म्हणून जिनिंग मालकाचे मदतीने वेगळीच शक्कल लढवून शेतकऱ्यांच्या कापसाच्या एकूण वजनामधून शेतकऱ्यांना न सांगता परस्पर कापूस कट्टी वजा करण्यात येत आहे. ज्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला प्रतिक्विंटल ३०० ते ४०० रुपयाचा फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. असा प्रकार जामनेर येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर पण घडत असुन दोन्ही ठिकाणचे केंद्र प्रमुख हे जिनिंग मालकांच्या मतानुसार कापूस खरेदी धोरण राबवत असल्याने जामनेर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. कापूस मोजतांना ओलावा आढळून आल्यास जास्तीतजास्त २ किलो कट्टी करावी व त्याची अधिकृतपणे काटापट्टीवर नोंद घेणे बंधनकारक असतांना येथील केंद्र चालक पाटील ग्रेडर हे सर्रास ७ ते ९ किलो प्रतिक्विंटल कट्टी लावत आहे. विशेष म्हणजे या कपात केलेल्या कापसाची कुठेही काटा पट्टी,हिशोब पावती वर नोंद घेतली जात नाही, कट्टीतुन जमा झालेल्या अतिरिक्त कापसाची जिनिंग मालक व ग्रेडर परस्पर विल्हेवाट लावत असल्याने या प्रकाराची चौकशी व्हावी. जिल्हाधिकारी यांचे दररोज ५० शेतकऱ्यांचे कापूस वाहन मोजण्याच्या आदेशाचे पालन व्हावे अशी अपेक्षाही शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content