जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा गावाजवळील समर्थ शाळेनजीक दुचाकी व रिक्षा यांच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन अनोळखी महिलासह दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर रिक्षाचालकासह चार महिला जखमी झाल्याची घटना सोमवारी २६ जून रोजी सकाळी १० वाजता घडली होती. याप्रकरणी रात्री उशीरा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
जळगाव ते कानळदा रोडवरील समर्थ शाळेजवळ सोमवारी २६ जून रोजी सकाळी दहा वाजता विचित्र अपघात झाला. महेश गोकूळ जोशी रा. पिंप्री ता. धरणगाव हे दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीवाय ९९०३) ने कानळदा रोडवरून जळगाव शहराकडे येत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत दुचाकीवर अनोळखी महिला आणि २२ वर्षीय तरूणी बसलेले होते. कानळदा गावाजवळील समर्थ शाळेसमोरून जात असतांना दुचाकीस्वार महेश यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तिघे रस्त्यावर पडले. तेवढ्यात जळगाव शहराकडून येणारी रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ८०७०) ने रोडवरील तिघांना चिरडले व रिक्षा देखील पलटी झाली. या रिक्षातील प्रवाशी विमलबाई चौधरी, मंगलाबाई चौधरी, सुनिता चौधरी, राधाबाई चौधरी आणि रिक्षा चालका रविंद्र भावलाल पाटील सर्व रा. आव्हाणे ता.जि.जळगाव हे जखमी झाले. या भीषण अपघातात जखमी झालेले दुचाकीस्वार आणि दोन अनोळखी महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, पोहेकॉ अनिल फेगडे आणि पोकॉ नरेंद्र पाटील करीत आहे. मयत झालेल्या दोन्ही महिलांची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.