नवी दिल्ली । कांद्यावरील निर्यातबंदीचा उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्यांना फटका बसल्याने या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी खा. सुभाष भामरे यांनी केली असून त्यांना याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येण्याबद्दल आश्वस्त करण्यात आल्याची माहिती आज भामरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
कांद्याचे भाव कोसळत असल्याने उत्तर महाराष्ट्र भागातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे निर्यातबंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा व निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केली आहे. डॉ. भामरे यांनी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कांदा प्रश्नावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली. यासंदर्भात भामरेंनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र देखील दिले आहे.
दरम्यान, कांदा निर्यातबंदी प्रश्नावर लवकरच तोडगा निघणार असून केंद्र सरकारच्या वतीने कांद्यावर लावण्यात आलेली बंदी उठवण्यात येईल. महाराष्ट्रातील शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी दिलासादायक माहिती माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आणि भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आज दिली आहे.