नाशिक प्रतिनिधी । आपल्याकडील कांदा खाऊन अमेरिकेत हाच कांदा मागवावा या मागणीसाठी एका शेतकर्याने थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रंप यांनाच साकडे घातले आहे.
या वृत्ताचा तपशील असा की,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रंप हे येत्या २४ व २५ फेब्रुवारी दोन दिवसांच्या भारताच्या दौर्यावर येत आहेत. त्यांच्या मेजवानीत कांद्याचा वापर करावा यासाठी निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी कांदे पाठवले आहे. साठे हे अल्प-भूधारक शेतकरी असून अवघी दोन एकर शेती ते करतात. शेतात कांदा पिकाची लागवड दरवर्षी करत असतात. यंदा देखील कांद्याची लागवड केली आणि अवकाळी पावसामुळे कांद्याचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादन घटले उत्पादन कमी झाल्याने कांद्याला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. तथापि, केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील कांद्यावर निर्यात बंदी केली. इतर देशांना सर्वाधिक महाराष्ट्राचा कांदा पसंत असूनही कांद्या निर्यात होत नाही. त्यामुळे भाव कोसळले आणि शेतकर्याचा कांदा उत्पादनासाठी केलेला खर्च देखील वसूल होत नसल्याने साठे व त्यांचे कुटुंब हवालदील झालेले आहेत. या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रंप यांनाच साकडे घेतले आहे.
अमेरिकेच्या जनतेला कांदा खाण्यास योग्य आहे तो अगोदर तुम्ही खाऊन पहा आणि नंतर तोच कांदा अमेरिकेत पाठवा अशी विनंती मोदी यांना करून निर्यात बंदी उठवण्याचे आव्हान करा असे पत्र लिहून पाठवले आहे. भारत हा कृषी प्रधान असून येथे शेतकर्यांचे सर्वाधिक शोषण होत आहे. शेतीला हमी भाव मिळत नाही, स्वामिनाथन आयोग लागू होत नाही, खते ,बियाणे यांच्या किंमती कमी होत नाही. त्यामुळे शेतकरी वर्षानुवर्षे कर्जबाजारी होत चालला आहे. या संदर्भात ट्रम्प यांनी भारत सरकारला मार्गदर्शन करावे असे आवाहन साठे यांनी केले आहे. साठे यांनी नुकतीच फास्ट पोस्टने कांदे आणि पत्र पाठवले आहे. आता त्यांच्या विनंतीची नेमकी कशी दखल घेतली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.