मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात पेट्रोलवर २७ रुपये टॅक्स आहे. नाना पटोलेंचं आंदोलन हे राज्य सरकारच्या विरोधातच असावं. गुजरात व इतर राज्यांनी १० रुपयांनी पेट्रोल दर कमी केले आहेत, महाराष्ट्रात देखील दर कमी करावेत, यासाठीच त्यांनी हे आंदोलन केलं असावं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांचा निषेध करण्यासाठी सायकल रॅली काढली. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. मात्र, या रॅलीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टीका केली आहे. “
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंच्या आंदोलनाला काँग्रेसचा मीडिया इव्हेंट असं म्हणून टोला लगावला आहे. “अजित पवार अर्थसंकल्प मांडताना पेट्रोलवरचे राज्य सरकारचे काही टॅक्स कमी करून दर कमी करणार आहेत असं दिसतंय. त्यामुळे त्याचं श्रेय घेण्यासाठी काँग्रेसकडून आधीच हा सायकल मोर्चा काढण्यात आला. पण राज्यात विरोधी पक्षाची जागा काँग्रेसला घेता येणार नाही. काँग्रेसचं देशातही विरोधी पक्ष म्हणून स्थान नाही. एकूणच काँग्रेसची अवस्था केविलवाणी आहे. या अवस्थेत त्यांना मीडिया इव्हेंट करावा लागणारच. तो ते करत आहेत”, असा टोला फडणवीसांनी लावला.
कोरोना काळानंतर राज्य सरकारचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. याविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुळात वीजबिलांचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम कधीच महाराष्ट्रात घडली नाही. ही मोगलाई आहे. शेतकऱ्यांना घोषित झालेली आर्थिक मदत मिळालेली नाही. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर देखील आम्ही सरकारला घेरण्याचा प्रयत्न करू”.