कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात व्याख्यानाचे आयोजन

5555

जळगाव प्रतिनिधी । मानवतेच्या उत्कर्षासाठी बाबासाहेबांचे कार्य होते. शोषणाच्या समस्या संपविण्यासाठी बाबासाहेबांचे जीवन प्रवाहित दिसून येते. शोषितांच्या उद्धारासाठी वृत्तपत्रातून जनजागृती करण्याचे काम ज्ञानसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भाषा प्रशाळा विभागाचे संचालक डॉ.म.सु.पगारे यांनी केले.

विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने “डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता” याविषयी आयोजित व्याख्यानात डॉ.पगारे बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा विभागाचे संचालक डॉ.अनिल डोंगरे होते. प्रमुख अतिथी म्हणून पर्यावरण शास्त्र प्रशाळा विभागाचे संचालक डॉ.एस.आर.थोरात, शिक्षणशास्त्र विभागाच्या संचालिका डॉ.मनीषा इंदाणी, जैवशास्त्र प्रशाळाचे संचालकडॉ. अरुण इंगळे यांच्यासह मंचावर जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ.सुधीर भटकर, डॉ.विनोद निताळे, डॉ.सोमनाथ वडनेरे, डॉ.गोपी सोरडे उपस्थित होते.

प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी माल्यार्पण केले. यानंतर प्रस्तावनेत डॉ.भटकर यांनी, बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेच्या स्मृती जागविण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याचा उद्देश सांगितला. यानंतर डॉ. म.सु.पगारे यांनी बोलतांना सांगितले की, समाजातील अस्पृश्यतेचे चटके सोसलेल्या डॉ.बाबासाहेबांनी मानवतेच्या मार्गाने वंचित, शोषितांच्या न्यायासाठी लढे दिले. त्यात महिलांसह वंचितांना संरक्षण, सन्मान, समानता मिळवून देत त्याचे अस्तित्व निर्माण करून दिले. अस्पृश्यता, समाजातील विषमता, भेदाभेद दूर करण्यासाठी बाबासाहेबांची पत्रकारिता महत्वाची ठरली.

डॉ.बाबासाहेबांच्या लेखनातून त्यांची प्रखर बुद्धिमत्ता दिसते. त्यांनी संपादकीय लेखांतून केलेली वैचारिक मांडणी सामाजिक बदलांना क्रांतिकारी दिशा देणारी ठरली. अग्रलेखातून त्यांचे लेखन, लेखांत दिलेले संदर्भ अचूक व महत्वाचे ठरले. ज्यांची हजारो वर्षांपासून वाचा दाबून ठेवली अशा मूक लोकांचे प्रश्न मांडणारे म्हणून मूकनायक वृत्तपत्र सुरू केले. वृत्तपत्रांतून बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणावर अधिक भर दिला, असेही डॉ.पगारे यांनी व्याख्यानातून सांगितले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल डोंगरे यांनी स्वत:ची ओळख करून घ्या आणि दुसऱ्यांना समजून घ्या यासाठी वृत्तपत्र उत्कृष्ट माध्यम आहे, याच वृत्तपत्राचा आधार घेत डॉ. बाबासाहेबांनी प्रबोधन केले असे सांगितले. मूकनायक शब्दाचा अर्थ सांगत डॉ. डोंगरे यांनी, सामाजिक प्रश्नांना वृत्तपत्रातून डॉ. आंबेडकरांनी वाचा फोडली. बाबासाहेबांच्या पत्रकारितेनेजीवन जगण्याची दिशा दिली हे स्पष्ट केले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिन्मय जगताप यांनी केले. आभार मयूर पाटील याने मानले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा प्रशाळेचे प्रा.डॉ. विजयघोरपडे, प्रा.डॉ.रमेश सरदार, प्रा.विश्वजीत चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी रंजना चौधरी, परमेश्वर थाटे, सुनील रडे यांचेसह सरिता सैनी, वैशाली पाटील, धनश्री राठोड, गणेश साळुंखे, मनीष मराठे, सुमित बोदडे, वासंती तडवी, विनोद शेलोरे, सुनील भोई आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content