जळगाव, प्रतिनिधी । निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जन्मदिवसानिमित्त लेवा गणबोली साहित्य मंडळ व जिल्हा साहित्य व सांस्कृतिक मंचातर्फे ( तिथीनुसार ) साहित्य प्रेमींतर्फे बहिणाबाई उद्यानात छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.
सकाळी 9 च्या सुमारास सर्वप्रथम थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा पुतळ्याचा परिसर स्वच्छ करण्यात येऊन विविध रानफुलांनी सजविण्यात आले. मंडळाचे सचिव व कलावंत तुषार वाघुळदे , सुजय पाटील , मनोज चंद्रात्रे , तारे , विलास चौधरी आणि साहित्य प्रेमींनी बहिणाबाईंची ” अरे संसार संसार ” आणि ” मन वढाय वढाय ” तसेच ” घरोटा ” आणि ” ‘ पेर्ते व्हा ‘ या कविता सादर केल्या .श्री.चौधरी आणि श्री.वाघुळदे यांनी बहिणाबाईंच्या जीवनाबद्दल तसेच काव्याबद्दल चर्चा केली. कसदार मातीत जन्मलेल्या या कवयित्रीचे काव्य हे अक्षरलेणंच असल्याचे उद्गार अनेकांनी काढले .याप्रसंगी दिलीप जोशी, शैलेंद्र पाटील , व्यावसायिक अशोकशेठ विसपुते , शिवाजी मुळीक , नरेंद्र शिवदे आदींची उपस्थिती होती.