मुंबई वृत्तसंस्था । मुंबईत दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असून तेथील आरोग्य यंत्रणेवर याचा ताण पडत आहे. हा ताण कमी करण्यासाठी अखेर म्हाडाने मदतीचा हात दिला आहे. म्हाडाने ठाणे जिल्ह्यात तीन कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मीरा-भाईंदर या तीन ठिकाणी जागेची चाचपणी सुरू केली आहे. लवकर कोविड सेंटरचे बांधकाम सुरू होणार आहे.
ठाणे सुरुवातीपासूनच रेड झोनमध्ये येत असून येथील रुग्णसंख्या काही कमी होण्याचे नाव घेत नाही. कालपर्यंतचा जिल्ह्यातील आकडा पाहिला तर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७७८१ असून सध्या ५४०८ अॅक्टिव्ह आहेत. हा आकडा मोठा असून तो पुढे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच येथे ही बेड कमी पडू नये, यासाठी राज्य सरकारने एमएमआरडीए प्रमाणे म्हाडालाही कोविड केअर सेंटर बांधण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार म्हाडा आता कामाला लागली आहे.जिल्ह्यात ठाणे शहर, कल्याण-डोंबिवली आणि मीरा-भाईंदर या पालिका क्षेत्रात तीन सेंटर उभारण्यात येणार आहेत. हे तिन्ही सेंटर सौम्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी असतील. येथे ऑक्सिजनची व्यवस्था असेल, तर डॉक्टर- नर्स यांच्यासाठीही आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात येणार आहे.