कमलनाथ सरकार संकटात : ज्योतिरादित्य शिंदेंसह समर्थक बंडाच्या पवित्र्यात

भोपाळ वृत्तसंस्था । ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक मंत्री आणि आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतल्याने मध्य प्रदेशातील कमलनाथ यांचे सरकार संकटात सापडल्याचे दिसून येत आहे.

मध्ये प्रदेश सरकारमध्ये कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटातील संघर्ष आता शिगेला पोहचल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांसह काँग्रेसच्या एकूण १७ आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने सरकार संकटात आले आहे. हे मंत्री आणि आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटातील असून, स्वत: शिंदेही बंडाच्या पावित्र्यात असून, त्यांनी भाजपाच्या एका बड्या नेत्याची भेट घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, शिंदे यांची समजूत घालण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र शिंदे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यानंतर काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. बंडाच्या तयारीत असणार्‍या या आमदारांमध्ये कमलनाथ सरकारमधील सहा मंत्र्यांचाही समावेश आहे. यातील इमरती देवी, प्रद्युम्न सिंह तोमर, महेंद्र सिंह सिसोदिया, तुलसी सिलावट, प्रभुराम चौधरी आणि गोविंद सिंह राजपूत हे आमदार कर्नाटकात पोहोचल्याचे वृत्त आहे. या बंडखोर आमदारांची जबाबदारी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या पुत्रावर सोपवण्यात आल्याची माहितीदेखील समोर आली आहे.

Protected Content