वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना भारत म्हणजे एक यशस्वी कथा वाटते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे या यशाच्या वाटचालीचे प्रतीक ठरले आहेत, असे गौरवोद्गारही ओबामा यांनी काढले आहेत.
‘राजकीय पक्षांमधील कटु संघर्ष, अनेक विभाजनवादी सशस्त्र चळवळी आणि भ्रष्टाचाराचे नवनवे घोटाळे घडूनही आधुनिक भारत ही यशस्वी कथा आहे, असे म्हणावे लागेल’, असे ओबामा यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.
ओबामा आपल्या अध्यक्षीय कार्यकाळातील अनुभवांवर दोन पुस्तके लिहित आहेत. पहिल्या अध्यक्षीय कार्यकाळातील अनुभवांवर आधारित ‘प्रॉमिस्ड लँड’ हे पहिले पुस्तक मंगळवारी जगभरात प्रकाशित झाले. दोनवेळा भारताचा दौरा केलेल्या ओबामा यांनी या देशाबद्दल आपले अनुभव कथन केले आहेत. ‘१९९०मधील अर्थबदलांमुळे भारताचेही बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेत परिवर्तन झाले. यामुळे भारतीयांची अतुलनीय उद्योजकीय कौशल्ये समोर आली. यामुळेच तंत्रज्ञान क्षेत्रे बहरली व मध्यमवर्ग विस्तारला. अनेक दृष्टीने आधुनिक भारत ही यशस्वी कथा आहे’, असे ओबामा यांनी आपल्या पुस्तकात म्हटले.
ओबामा यांनी या अर्थबदलांचे शिल्पकार म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांचा गौरव केला आहे. ‘देशातील एका छोट्या शीख समुदायातील एक व्यक्ती या भूमीतील सर्वांत मोठे पद ग्रहण करते. लोकांना भावणाऱ्या आवेगाचा अभाव असलेल्या पण कोणत्याही भ्रष्टाचारापासून लांब असलेली स्वच्छ प्रतिमा आणि उच्च जीवनमूल्यांची मांडणी यामुळे या व्यक्तीने जनतेचा विश्वास जिंकला. मी आणि सिंग यांच्यामध्ये आपुलकीचे व उत्पादनक्षम नाते जुळले होते. खरे तर परराष्ट्रीय धोरणांबाबत सिंग कमालीचे सावध असत. अमेरिकेच्या हेतूंविषयी सदा संशयी असलेल्या भारतीय नोकरशाहीच्या धारणा मागे ठेवून फार पुढे जाण्याची त्यांची तयारी नसे. तरीही असामान्य विद्वान व सभ्य अशा या नेत्याच्या साथीने अमेरिकेने भारतासोबत अनेक सहकार्याचे करार केले. दहशतवादविरोधी, आरोग्य, अणुक्षेत्र व व्यापारी करारांद्वारे भारतासोबतचे संबंध अधिक दृढ झाले’, असे ओबामा म्हटले आहे.
‘भारत व महात्मा गांधी हे समीकरण मला नेहमी आकर्षित करते’, असे ओबामा यांनी लिहिले आहे. ‘अब्राहम लिंकन, मार्टिन ल्युथर किंग व नेल्सन मंडेला यांच्याप्रमाणेच महात्मा गांधी यांचाही माझ्या विचारांवर पगडा आहे. तरुणपणी मी गांधींचे लिखाण वाचले. त्याचाच माझ्या अंतर्मनावर प्रभाव आहे. त्यांचा सत्याग्रह, सत्याचे प्रयोग आणि शांततापूर्ण आंदोलने ही संपूर्ण मानवतेवर प्रभाव टाकणारी ठरली आहेत. खरे तर त्यांच्या विचारांहूनही अधिक त्यांची कृती मला अधिक प्रभावित करते. स्वत:चा जीव धोक्यात घालून, तुरुंगात जाऊन, स्वातंत्र्यलढ्यामध्ये स्वत:ला झोकून देत गांधी यांनी भारतीय स्वातंत्र्याचा लढा उभारला. १९१५ मध्ये ब्रिटिशांविरोधात शांततापूर्ण चळवळ उभी करून ३० वर्षे अथक त्याचा चेहरा बनले. यामुळे केवळ भारत व भारतीय उपखंडाचा साम्राज्यवादी इतिहास पालटला नाही, तर संपूर्ण जगालाच गांधी यांनी नैतिक सामर्थ्य दिले’, असे ओबामा म्हणतात.