ऑपरेशन ब्ल्यू स्टार’चा उल्लेख करत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारला इशारा

 

 

अमृतसर : वृत्तसंस्था । पंजाबजचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केंद्राला गंभीर इशारा दिला आहे. अमरिंदर सिंह यांनी १९८४ च्या ऑपरेशन ब्लू स्टारचं उदाहरण देत लवकर तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे.

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं दिल्लीत आंदोलन सुरू आहे. भारताबरोबरच परदेशातही याचे पडसाद उमटताना दिसत आहे. केंद्र सरकारकडून मागण्यांची दखल घेतली जात नसल्यानं आंदोलन आणखी तीव्र होऊ लागलं आहे. कायदे रद्द केल्याशिवाय घरी जाणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे

मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत शेतकरी आंदोलनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. शेतकरी आंदोलकांच्या मागण्यावर तोडगा काढण्यास होणारा विलंब १९८४ ऑपरेशन ब्लू स्टारच्या दिशेनं राज्याला ढकलू शकतो, असं ते बैठकीत म्हणाले. शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत तातडीने तोडगा काढण्याची गरज असल्याच्या विधानावर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी बैठकीत जोर दिला.

बैठकीत मुख्यमंत्री काय म्हणाले याबद्दलची माहिती पत्रकातून देण्यात आली. “मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला आणि सांगितलं की, पाकिस्तानाकडून असलेल्या धोक्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सर्व गोष्टी हाताबाहेर जाण्याआधी आपल्याला हा मुद्दा सोडवण्यासाठी काम करावं लागणार आहे. सीमेपलीकडून (पाकिस्तानातून) किती ड्रोन्स, शस्त्रास्त्र आणि स्फोटक तस्करीच्या मार्गानं पंजाबमध्ये आणण्यात आले आहेत, याची आपल्याला माहिती असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितलं.”

 

ऑपरेशन ब्लू स्टार होण्याआधी चाललेल्या चर्चेची आठवणही मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काढली. ४२ मागण्यांवरून दोन महिने चर्चा चालल्यानंतर पंजाबमध्ये अशांतता निर्माण झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला होता की असंतोष धुसमत आहे, याचा स्फोट होईल, अशी त्यावेळच्या घडामोडींची आठवणही अमरिंदर सिंह यांनी बैठकीत सांगितल्याचं जनसंपर्क विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

Protected Content