जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात आलेली मरगळ दूर सारत एकमेकांना साहाय्य करण्याची वेळी आली आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत जवळपास सर्वच बाजारपेठ खुल्या झाल्या असून नागरिकांनी दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन ऐवजी स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करावी, असे आवाहन फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे करण्यात आले आहे.
कोरोनामुळे देश आर्थिकदृष्ट्या फार मागे गेला असून व्यापारी वर्गाचे लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान झाले आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींच्या मदतीसाठी कोरोना काळात स्थानिकच पुढे आले आहेत. प्रत्येकाने आपापल्या परीने मदतीचा हात पूढे केला होता. मिशन बिगीन अंतर्गत सर्वच आस्थापना सुरू झाल्या असून नवरात्री, दसरा, दिवाळी, नाताळच्या पार्श्वभूमीवर नागरिक खरेदीला प्राधान्य देत आहे. नागरिकांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन वेबसाईटवर सवलतीचे आमिष दाखविले जात आहे. परंतु आपणच आपल्या स्थानिकांना पुन्हा उभारी देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. कोणत्याही नागरिकाने ऑनलाईनच्या फ़ंद्यात न पडता स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी करावी, असे आवाहन ‘फाम’चे अध्यक्ष विनेश मेहता, महासंचालक आशिष मेहता, उपाध्यक्ष ललीत बरडीया यांनी केले आहे.