मुंबई: वृत्तसंस्था । परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी पोलिसांना दिलेला कबुली जबाबानुसार पत्रात उल्लेख असलेल्या संजय पाटील यांच्या चॅटचा मजकूर आणि प्रत्यक्ष दिलेल्या जबाबात तफावत आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित स पो नि सचिन वाझेंना कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. सिंग यांनी एका पोलीस अधिकाऱ्याच्या व्हाट्सअॅप चॅटचा पुरावाही दिला होता. त्यानंतर देशमुख यांना त्यांचं गृहमंत्रीपदही सोडावं लागलं. मात्र, प्रत्यक्षात देशमुख यांनी वाझेंना वसुलीचे आदेश दिले नसल्याची माहिती उघड झाली आहे.
देशमुखांनी मुंबईतील 1750 बार आणि रेस्टॉरंटकडून प्रत्येकी 3 लाख रुपये जमा करण्यास वाझेला सांगितल्याचा चॅटमध्ये उल्लेख आहे. पण पण प्रत्यक्ष जबाबात देशमुख यांनी स्वतःहून वाझेंना त्याबाबत विचारणा केल्याचा उल्लेख असल्याचं दिसून आलं आहे. पाटील यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील 1750 बार आणि रेस्टॉरंटकडून प्रत्येकी 3 लाख रुपये वसूल केले जात असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. ती खरी आहे का? मुंबईत असा काही प्रकार सुरू आहे का? अशी विचारणा देशमुख यांनी वाझेंना केली होती. तशी माहिती वाझेंनी मला दिली होती, असं पाटील यांनी म्हटलं आहे. याचा अर्थ देशमुख यांनी वाझेंना पैसे जमा करण्यास किंवा वसूल करण्यास सांगितलं नव्हतं, असं स्पष्ट होत आहे. त्यामुळे या पोलीस अधिकाऱ्याच्या जबाबामुळे परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
राजू भुजबळ आणि संजय पाटील हे 4 मार्चरोजी देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर भेटल्याचा सिंग यांच्या पत्रात उल्लेख आहे. मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांनी आम्हा तिघांची देशमुखांसोबत बैठकच झाली नसल्याचा जबाब दिला आहे. 4 मार्च रोजी अधिवेशनाच्या ब्रिफिंगसाठी आपण गृहमंत्र्यांना त्यांच्या बंगल्यावर भेटलो होतो. पण तिथे संजय पाटील नव्हते. ब्रिफिंग करून बाहेर पडल्यावर बंगल्याच्या दारात भुजबळ भेटल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सिंग यांच्या या आरोपातही तथ्य नसल्याचं उघड झालं आहे.
सचिन वाझे आणि संजय पाटील यांची पोलीस आयुक्तालयात भेट झाली होती. त्यावेळी वाझेंनी वसुलीचा विषय काढून गृहमंत्र्यांच नाव घेतलं. मात्र माजी गृहमंत्री आणि सचिन वाझे भेटले होते? का याबद्दल मला माहिती नाही, असं संजय पाटील यांनी त्यांच्या जबाबात म्हटलं आहे. पाटील यांनी त्यांच्या जबाबात परमबीर यांच्यासोबत झालेले चॅटिंग त्याचेच असल्याचं सांगितलंय.
पाटील हे 1 तारखेला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांच्या शासकीय निवस्थानी भेटले होते. तर भुजबळ हे 4 तारखेला देशमुख यांना भेटले होते. मात्र, या दोन्ही अधिकाऱ्यांनी देशमुखांकडून बार आणि पब्सच्या वसुलीसंदर्भात काहीही विचारणा करण्यात आली नसल्याचं म्हटलं आहे.