मुंबई प्रतिनिधी | एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज सायंकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कोर्टाने विलीनीकरणाचा विचार करण्यासाठी समिती नेमली आहे. समितीचा जो काही अहवाल येईल तो आम्ही मान्य करू. पण तोपर्यंत संप चालू राहू शकत नाही. त्यामुळे कामगारांना अंतरिम वाढ देण्याचा पर्याय दिला आहे. सकारात्मक चर्चा झाली. आम्ही ऑफर दिली आहे. उद्या सकाळी ११ वाजता या संदर्भात पुन्हा बैठक होणार आह. संघटनेला दोन- तीन पर्याय दिले आहेत. अंतरिम वेतनवाढ देऊ शकतो. वाढ दिल्यानंतर समितीने एसटीच्या विलीनीकरणाचा निर्णय दिला तर विलीनीकरणानंतरही पगारवाढ दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
परब पुढे म्हणाले की, वेतन वेळेवर मिळाव. वेतन वाढावं अशी कर्मचार्यांची मागणी आहे. उच्च न्यायालयाने समिती बनवली आहे. समितीकडे सध्या हा विषय आहे. १२ आठवड्यात अहवाल द्यायचा आहे. मुख्यमंत्री तो कोर्टात सादर करेल. कोर्टाच्या आदेशाचं कोणीच उल्लंघन करू शकत नाही. कामगारांना जे जे हवं आहे ते आम्ही देत आहोत. एका बाजूने समितीची प्रक्रिया सुरू आहे. याला बराच कालावधी लागणार आहे. कामगारांनी अधिक ताणू नये. सरकार दोन पावलं पुढे यायला तयार आहे. तुम्ही दोन पावलं मागे या. चर्चेने मार्ग काढू अस सांगतानाच कामगारांनी संप मागे घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. तसेच या संपात कोणतंही राजकारण केलं जात नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.