एनआयएची सचिन वाझेंवर आता बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाईची तयारी

 

मुंबई:  वृत्तसंस्था । अंबानी स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून  सचिन वाझे यांच्यावर  बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई होण्याची शक्यता   आहे.

 

 

एनआयए सचिन वाझेंविरोधात यूएपीएची कलम लावण्याची तयारी करत येत आहे.  एनआयएच्या हाती नुकतेच सचिन वाझे यांच्या ट्रायडंट हॉटेलमधील मुक्कामाचे आणखी काही तपशील समोर आले होते.

 

राष्ट्रीय तपास यंत्रणेने सचिन वाझे यांच्या विरोधात यूएपीए म्हणजेच Unlawful Activities Prevention Act हा कायदा लावण्याची मागणी केली आहे. यूएपीए कायदा लागल्यास सचिन वाझे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हा कायदा सहसा दहशतवाद्यांवर किंवा राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभाग असणाऱ्यांवर लावला जातो.

 

सचिन वाझे राहत असलेल्या ट्रायडंटमधील खोलीची झडती घेतली होती. याठिकाणी  जवळपास तीन तास सर्च ऑपरेशन सुरु होते. त्यानंतर NIA अधिकारी ट्रायडंट हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज घेऊन परतले होते. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सचिन वाझे हे 16 ते 20 फेब्रुवारी या काळात ट्रायडंट हॉटेलमध्ये वास्तव्याला होते. त्यानंतर 24 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सोडण्यात आली होती. त्यामुळे हा संपूर्ण कट ट्रायडंट हॉटेलमध्येच शिजला का, याचा तपास सुरु आहे.

 

सचिन वाझे यांनी बोगस आधारकार्ड दाखवून ट्रायडंट हॉटेलमध्ये प्रवेश मिळवला होता. यावेळी त्यांच्याकडे 5 बॅगा होत्या. यापैकी एका बॅगेत जिलेटीनच्या कांड्या असल्याचा NIAला संशय आहे.   त्यांच्यासोबत एक महिलाही होती. या महिलेच्या हातात पैसे मोजण्याचे यंत्र होते. त्यामुळे ही महिलाही या कटात सहभागी होती का, याचा शोध NIA घेत आहे.

 

 

सचिन वाझे यांचे बनावट आधारकार्ड समोर आलं आहे. याच आधारकार्डचा वापर करत वाझे हे ट्रायडेंट हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सचिन वाझे यांच्या बनावट आधार कार्डवर सुशांत सदाशिव खामकर असे नाव देण्यात आले आहे. त्यावर वाढदिवसाची तारीखही लिहिण्यात आली आहे.

 

वाझेंच्या ऑफिसची झाडाझडती घेताना एनआयएच्या हाती सचिन वाझेंची डायरी लागली होती. कोणत्या दिवशी कोणाला भेटायचंय, याचीही तारीख डायरीत नमूद करण्यात आली आहे. पब्ज, बार, बुकी आणि इतर महत्त्वाच्या कारवायांचा उल्लेख आहे. या डायरीतून हफ्त्याची गुपितं उघडकीस येण्याची शक्यता आहे. कुणाला किती पैसे जात होते, याचा हिशेब सचिन वाझे ठेवत होते. डायरीत मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्का पार्लरची यादी आहे. ज्यांनी पैसे दिले त्याबाबत कोड भाषेत नोंद आहे.

Protected Content