मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा रमेश लटके यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरला, तर भाजपतर्फे मुरजी पटेल यांनी उमेदवारी दाखल केली. या पोटनिवडणुकीत तब्बल २५ उमेदवार रिंगणात आहेत. आज उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंविरोधात २४ उमेदवार रिंगणात ठाकले आहेत. भाजपच्या मुरजी पटेल यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही दोन अर्ज भरण्यात आले आहेत. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके उमेदवार आहेत. ठाकरे शिवसेनेकडून दक्षता म्हून संदीप नाईक यांचा अर्ज देखील भरण्यात आला आहे.
शिवसेना, भाजपशिवाय पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक, सैनिक समाज पार्टी, भारत जनआधार पार्टी, महाराष्ट्र विकास आघाडी, उत्तर भारतीय विकास सेना, राष्ट्रीय मराठा पार्टी, आपकी अपनी पार्टी याशिवाय काही अपक्षांनी अर्ज भरले आहेत. या एकूण उमेदवारी अर्जांची आज छाननी होणार आहे. सोमवार १७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. आलेल्या २५ अर्जांमधून आता किती उमेदवार माघार घेतात याची उत्सुकता आहे.