नागपूर: वृत्तसंस्था । ग्राहक आणि शेतकऱ्यांना वीज माफी देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने ऊर्जा खात्याला १० हजार कोटी रुपये द्यावेत. जमत नसेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन वीज बिलाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील ठाकरे सरकार हे मोगलांसारखं वागत आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ७८ लाख वीज ग्राहकांना वीज कापण्याच्या या सरकारने नोटीसा पाठवल्या आहेत. या पूर्वी अशा घटना कधीच घडल्या नव्हत्या. त्यामुळे सरकारने ऊर्जा खात्याला तातडीने दहा हजार कोटी रुपये द्यावेत. ऊर्जा खात्याने ही रक्कम महावितरणला अनुदान म्हणून द्यावी. महावितरणने या रकमेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना अनुदान देऊन त्यांना दिलासा द्यावा. त्यांची वीज बिलं रद्द करावीत, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.
अव्वाच्या सव्वा वीज बिल आल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ग्राहक हतबल झाले आहेत. त्यांच्यात प्रचंड भीती निर्माण झाली असून आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना आत्महत्येकडे नेण्याचा हा प्रयत्न आहे. सरकारने विनाविलंब या नोटीसा परत घ्याव्यात. शेतकरी आणि ग्राहकांचे वीज कनेक्शन कापू नये. आम्ही शेतकरी आणि ग्राहकांची वीज कापू देणार नाही, प्रत्येक घरासमोर उभं राहून सरकारी कारवाईला विरोध करू, असा इशाराही त्यांनी दिला.
आम्ही शेतकऱ्यांची वीज कापली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनगटात ताकद होती. पाच वर्षे शेतकऱ्यांची वीज कापणार नाही, असं फडणवीसांनी ठामपणे सांगितलं होतं. पण या मुख्यमंत्र्यांच्या मनगटात तसं सांगण्याची ताकद नाही. त्यामुळे त्यांनी जमत नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या योजना आणि पायाभूत सुविधांसाठी कंपन्यांना ४० हजार कोटी रुपये द्यावेत. सरकारकडे पैसे नसतील तर त्यांनी कर्ज काढावं. शेतकऱ्यांसाठी कर्ज नाही घेणार तर कुणासाठी कर्ज घेणार? असा सवाल करतानाच राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये, असंही ते म्हणाले