यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शेतकऱ्यांनी कारखान्याच्या उस लागवड धोरणानुसार उसाची लागवड केली. परंतु, मुक्ताईसाखर कारखान्याच्या चुकीच्या धोरणामुळे उसाची मुदतीत तोडणी न झाल्याने शेतकऱ्यांना ते पेटवून देण्याशिवाय पर्याय नसल्याने तहसीलदारांनी कारखान्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांची समस्या सोडवावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनाचा आशय असा की, मुक्ताईसाखर कारखान्याच्या चुकीच्या धोरणामुळे मुदतीत उस तोडणी न झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. कारखान्यास वारंवार विनंती करूनही उस तोड करण्यात आलेली नाही. यामुळे उसाचे वजनही कमी होईल. यातून शेतकऱ्यांना अपेक्षित रक्कम मिळू शकणार नाही. कारखान्याकडे उस तोडणीसाठी मजूरच नसल्याचे सांगण्यात येत आहे. कारखान्याकडून शेतकऱ्यांनी स्वतः उसाची तोडणी करून ते कारखान्यापर्यंत आणून द्यावा असे स्पष्ट करण्यात येत आहे. तरी तहसीलदारांनी कारखान्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर किरण जावळे, नितीन जावळे, कल्पना जावळे, मुरलीधर चौधरी,रेखा चौधरी, सुरेखा चौधरी,गोपाल महाजन, दिलीप पाटील, गजानन पाटील, मिलिंद जावळे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहे.